Friday, November 15, 2024

 वृत्त क्र. 1097

नांदेडमध्ये मतदार माहिती चिठ्ठी वाटप गतीने सुरू 

 बीएलओशी संपर्क साधावा ; बीएलओंना सहकार्य करावे 

नांदेड दि.15:  निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठी मध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक, इत्यादी आवश्यक माहिती आहे.नांदेड जिल्हयातील सर्व मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून नागरिकांनी बीएलओंकडून चिठ्ठी प्राप्त करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

16 नांदेड लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत मतदार माहिती चिठ्ठी वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मतदार माहिती चिठ्ठी मतदारांकडे असल्यास मतदान केंद्र व अन्य माहिती सुलभतेने प्राप्त होते. मतदान लवकर करण्यास त्यामुळे मदत होते. नागरिकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, घरी येणाऱ्या आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. १८ तारखेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओची उपस्थिती असणार असून त्याच्याकडून मतदार माहिती चिठ्ठी  प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मतदान माहिती चिठठीमध्ये आपले नाव, वय, लिंग, आपल्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक, राज्य, लोकसभेचे क्षेत्र, विधानसभेचे क्षेत्र,मतदान केंद्राचा पत्ता, भाग क्रमांक, तसेच आपला अनुक्रमांक देखील असतो. त्यामुळे अत्यंत सुलभतेने स्वतःचे नाव तपासून मतदान करता येते. नागरिकांनी गतीने मतदान करण्यासाठी याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मतदान माहिती चिठठी ओळखपत्र नाही

तथापि, मतदान माहिती चिठठी ही मतदान सुलभतेने व्हावे यासाठी निर्माण केलेली यंत्रणा आहे. मात्र मतदान माहिती चिठठी हे ओळखपत्र नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे ओळखपत्रासाठी १२ पुरावे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून त्यानुसारच ओळख पटवून घ्यावी. मतदान माहिती चिठठी मतदान सुलभतेने होण्यासाठी मदतीची आहे.

ऑनलाइनही मतदार चिठ्ठी उपलब्ध

इलेक्ट्रॉल सर्च डॉट ई सी आय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपला इपिक नंबर अर्थात मतदार ओळखपत्रावर असणारा क्रमांक टाकावा. त्यामध्ये राज्य महाराष्ट्र टाकावे.कॅपच्याचा कोड टाकल्यानंतर सर्च क्लिक केल्यावर आपल्या नावाची संपूर्ण माहिती उमटते. आपल्या नावामध्ये व्हीव डिटेल क्लिक केल्यास आपली संपूर्ण माहिती स्क्रीनवर उमटते. आपणही माहिती डाऊनलोड सुद्धा करू शकता. इंटरनेट वापरणाऱ्या व अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या सर्व तरुणांनी अशा प्रकारे आपली मतदान माहिती चिठठी स्वतः मिळवावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. तसेच आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना ही मतदान माहिती चिठठी मिळून देण्यासाठी मदत करण्याचे ही सुचविले आहे. याशिवाय इलेक्ट्रॉल हेल्पलाइन ॲप डाऊनलोड केल्यास हे अगदी सहजपणे शक्य आहे. याशिवाय युट्युब वर देखील कशा पद्धतीने वोटर लिस्ट मध्ये आपले नाव शोधावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे त्यासाठी https://youtu.be/Si6i9tcTp24 या लिंक वर जाऊन मार्गदर्शन मिळू शकते.

बीएलओचा क्रमांक उपलब्ध

आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात आपली मतदार माहिती चिट्ठी मिळाली नसेल तर आपल्या बीएलओचा अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांकही आपल्याला माहिती होऊ शकतो. यासाठी देखील निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन ॲप मध्ये सर्वांचे नंबर टाकले आहे. हा ॲप डाऊनलोड करणे अतिशय सोपे आहे. प्ले स्टोअर मध्ये जाऊन अतिशय सुलभतेने हा ॲप डाऊनलोड करता येते व या ठिकाणावरून नो युवर बीएलओ असे म्हटल्यानंतर आपल्या मतदार ओळखपत्रावरील नंबर टाकल्यानंतर आपल्या परिसरातील बीएलओचा मोबाईल नंबर आपल्याला माहिती होतो.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...