Wednesday, August 14, 2024

#स्वातंत्र्यदिन

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावरील शुभेच्छा संदेश प्रसिद्धीसाठी


पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश


भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनिक, सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मी अभिवादन करतो.

आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. लाखो लोकांच्या बलिदानानंतर हा दिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. आपली लोकशाही हळूहळू प्रौढ होत असून आम्ही आणखीन जाणीव, जबाबदारीने काम करावे, असे संकेत यातून दिले जात आहेत.

स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन आमची वाटचाल असली पाहिजे. घटनेच्या परिघात राहून स्वातंत्र्याचा समान उपभोग घेणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात स्वातंत्र्य ही जबाबदारीही आहे. देशातील समस्या, देशातील परिस्थिती यावर टीकाटिपणी करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सोबतच आपण नेमके देशासाठी काय करू शकतो? किती सुलभतेने समस्या सोडवू शकतो आणि आपण आपल्या देशासाठी काय दायित्व देऊ शकतो याचे आत्मचिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. देशासाठी सिमेवरच लढावे लागते असे नाही तर आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकतेने, सचोटीने करणे ही देखील देशसेवा आहे.

राज्य शासनाने लोकांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी काही नव्या योजना यावर्षी सुरू केल्या आहेत. महिलांना आर्थिक बळ, आर्थिक स्वातंत्र्याचा पाया घालण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यात राबविली जात आहे. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मातृ वंदना योजना, आनंदाचा शिधा योजना, वेगवेगळ्या घरकुल योजना अशा कितीतरी योजना राज्यात सध्या सुरू आहेत.या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनासोबत सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या अशा या योजना आहेत. या योजनांची उत्तम अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असून त्याला तसाच प्रतिसाद जनतेकडून मिळावा ही अपेक्षा आहे.

#नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक परिस्थिती उत्तम आहे. सोबतच आपण गेल्या वर्षभरात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भूगर्भात पाणी पातळी वाढत आहे. ही धरणी, ही पृथ्वी, आपली आई असून पुढच्या पिढीसाठी तिच्या संगोपनाची, तिच्या उज्वल भविष्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा मुरेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठवाड्यासारख्या प्रदेशांमध्ये प्रत्येक शेतातील विहिरीला मुबलक पाणी असावे, प्रत्येक शेताला पाणी मिळावे यासाठी जलसंधारणाच्या कामाला सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. शासन त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्वांची ही साथ मिळावी अशी अपेक्षा आहे.

यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एका वेब पोर्टलची सुरुवात 15 ऑगस्ट पासून आम्ही करत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत किंवा नगरपालिका नगर परिषदांपर्यंत पोहोचून जनतेला आपला हक्क मागण्यासाठी मोठी ससेहोलपट करावी लागते त्यावर मात म्हणून हे पोर्टल काम करणार आहे प्रशासनातर्फे गतिशील पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला जाईल अशा पद्धतीची रचना आम्ही करतो आहे मात्र हे पोर्टल पुढच्या काळातही उत्तम प्रकारे सुरू राहावेत व प्रशासन व सामान्य जनतेच्या मधला दुवा बनावेत यासाठी सामान्य जनतेकडूनही मोठ्या प्रमाणात आम्ही अपेक्षा करत आहे लवकरच या संदर्भातील लिंक आम्ही माध्यमांमधून जाहीर करणार आहोत.

लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका अनिवार्य आहे. या निवडणुकांमधून मतदानाद्वारे आपले लोकप्रतिनिधी निवडणे नागरिकांचे कर्तव्य आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला मतदान करायचे आहे. त्यासाठी 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या नावाबाबतची खातरजमा करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वावर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सतरा व अठरा तारखेच्या विशेष मतदार नोंदणी अभियानात सहभागी होण्याचे मी आवाहन करीत आहे.

आजचा दिवस हा देशासाठी नव्याने प्रण करण्याचा दिवस आहे. आपला देश अधिकाधिक प्रगत होईल, यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या घरापासून याची सुरुवात होऊ शकते. सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, धर्म, पंथ, समुदाय, जात यावरून भेदाभेद न करणे, सार्वजनिक मालमत्तेप्रती आपले दायित्व आणि परस्परांबद्दलच्या शुभचिंतनातून देखील मोठे कार्य सिध्दीस जाऊ शकते. त्यामुळे सकल समाजाचा सामाजिक पुरुषार्थ वाढीस लागो, अशी अपेक्षा आपण करू या.

मी पुन:श्च एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.

जय हिंद जय महाराष्ट्र

शुभेच्छांसह..

गिरीश महाजन

ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री नांदेड
0000







No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...