वृत्त क्र. 725
भोकर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा आज मुख्य सोहळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथून राज्यस्तरीय शुभारंभ करणार;नांदेड जिल्हयात भोकर येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती
नांदेड, दि. 16 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) बालेवाडी (पुणे) येथून होणार आहे. यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व अन्य मान्यवर लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय समारंभामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना सहभागी होता यावे, यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बालेवाडी येथील समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय कार्यक्रमातील नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम भोकर बाजार समितीच्या परिसरातील हॉलमध्ये होणार आहे. याशिवाय पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध लोकार्पण कार्यक्रमाचे भोकर शहरात आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये भोकर विश्रामगृहाचे लोकार्पण,राज्य मार्गाचे हुडूको अंतर्गत सुधारणा, पिंपळडोह तलाव उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन, सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयाचे लोकार्पण, तहसील व उपविभागीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे भूमिपूजन, शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम, भोकर येथील तलावाचे सुशोभीकरण, आयटीआय इमारतीचे लोकार्पण, संत सेवालाल महाराज स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद मैदानावर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
0000
No comments:
Post a Comment