Friday, February 23, 2024

 नमो महारोजगार मेळाव्यात आज उमेदवारांच्या मुलाखती आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे करिअर विषयक मार्गदर्शन

·         24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून मुलाखतींना होणार सुरुवात

·         सुमारे 16 हजार युवक-युवतींनी केली ऑनलाईन नोंदणी

लातूर, दि. 23 :  राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन झाले. या मेळाव्यात आज, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून रोजगार इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत. लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित या मेळाव्यासाठी सुमारे 16 हजार युवक-युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या मेळाव्यात 24 फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेले विविध उद्योग, आस्थापना यांच्यामार्फत रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सकाळी 9 पासून सुरु होणार आहे.  मुख्य सभामंडपात सकाळी 11 पासून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि लाभार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित पांढारकर यांचे, तसेच  स्टार्टअप मधील संधी व आव्हाने याविषयी राजीव रंजन आणि कुणाल क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच फिजिओथेरेपी व वैद्यकीय करिअरमधील संधी याबाबतही मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हे युवक-युवतींना मार्गदर्शन करणार आहेत.

*****



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...