शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत रविवारी
महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रविवार दिनांक 25 जून रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नांदेड यांच्यावतीने अबचलनगर मैदान, नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थिताचे उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक आरोग्य तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व प्रेरणा प्रकल्पातर्गंत शेतकरी आत्महत्या संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच थायरॉईड व एचबी 1सी यासारख्या आवश्यक त्या रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी जन सामान्यांचे आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून योजनेतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे मोफत तयार करुन देण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत हे कार्ड तयार करुन घेण्यासाठी लाभार्थ्यांनी पीएम कार्ड किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड, लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेवून यावा. वरील आरोग्य विषयक योजनांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment