Wednesday, July 27, 2022

15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व कार्यालये, 

शाळामहाविद्यालये तंबाखू मुक्त करा

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


नांदेड (जिमाका) दि. 27 :- तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण व त्यामुळे आरोग्यावरील होणारे दुष्परिणाम लक्षात घेता राज्यात तंबाखू सेवनावर अनेक निर्बंध घातले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी ह्या तंबाखू मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. या निर्बंधांमुळे सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था ह्या तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्यामुळे विद्रूप करणे तसेच थुंकीद्वारे पसरणारे संसर्गजन्य रोगांवर अटकाव आणता येऊ शकतो. सर्वांनी या नियमांचे तंतोतंत पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

 

सार्वजनिक ठिकाणी तसेच सर्व कार्यालये, संस्थेमध्ये आणि संस्थेच्या तीनशे फुट अंतरामध्ये धुम्रपान तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जसे की पान मसाला, गुटखा आदी सेवन करणे अथवा विक्री करणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखू दान पेटी ठेवण्याचे आदेशात नमूद आहे. कार्यालयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या दान पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. कार्यालयीन वेळेत तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार दोनशे रुपयांपर्यंत दंड आकारल्या जाऊ शकतो. हा दंड संस्था प्रमुख लावू शकतात. तसेच जिल्ह्यात तंबाखू धाड पथक स्थापन करण्यात आलेले आहे. या पथकामार्फत उल्लंघन करणाऱ्यांनासोबतच उल्लंघन होत असलेल्या संस्था प्रमुखाला दंड लावण्यात येणार आहे. सर्व कार्यालये प्रमुखांनी या वर्षी 15 ऑगस्टच्या पुर्वी आपले कार्यालय तंबाखू मुक्त घोषित करावयाचे आहे. भविष्यात आपल्या कार्यालय आणि परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.


सर्व शाळा, महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी यांनी तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थेंचे निकष यावर्षी 15 ऑगस्टच्या पुर्वी करणे बंधनकारक आहे. सर्व निकष पूर्ण केलेल्या शैक्षणिक संस्थाना तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था असे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था आणि कार्यालये करण्यासाठी तांत्रिक मदत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्या मार्फत करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असल्यात अथवा तंबाखू सेवनाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तसेच तंबाखू व्यसन सोडण्यासाठी 1800 110 456 किंवा 1800 112 356 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावाअसेही आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...