Wednesday, July 27, 2022

 मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावेत

-  जिल्हा‍ निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

§  1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहिम राज्यभर 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार आहे. जिल्‍हयातील पात्र मतदारांनी मतदार यादीतील नावाशी 1 ऑगस्‍टपासुन मोठ्या संख्‍येने आधार क्रमांकाची जोडणी करून घ्यावी. त्यासाठी अर्ज क्र. 6 (ब) भरून देण्‍यासाठी https://eci.gov.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in/  या संकेतस्‍थळास भेट द्यावी. अथवा आपल्‍या भागातील संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांचेकडे छापील अर्ज क्र. 6 (ब) भरून द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केले आहे. 

 

निवडणूक कायदा अधिनियम 2021 अन्‍वये लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 मध्‍ये सुधारणा केल्‍या आहेत. त्‍यानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्‍यासाठी आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडुन ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्‍याबाबतच्‍या सुधारणा अंतर्भुत आहेत. आधार क्रमांक मिळवण्‍याचा उद्देश मतदार यादीतील त्‍याच्‍या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्‍यात त्‍यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. 

 

या सुधारणांची अंमलबजावणी 1 ऑगस्‍ट 2022 पासुन लागु होणार आहे. हा कायदा आणि नियमामध्‍ये केलेल्‍या सुधारणानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रत्‍येक व्‍यक्‍तीकडून आधार क्रमांक विहीत स्‍वरूपात व विहीत रितीने मिळविण्‍यासाठी वैधानिकरित्‍या प्राधिकृत करण्‍यात आलेले आहे. मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान कार्डासोबत मतदारांना आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्‍यावतीने ऐच्छिक आहे.  यासाठी लागणारा नमुना अर्ज 6 ब च्‍या छापील प्रती उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. 17 जुन 2022 च्‍या अधिसूचनेनूसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्‍पुर्वी मतदार यादीत नाव असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीस त्‍याचा आधार क्रमांक अर्ज 6 (ब)  मध्‍ये भरून देता येईल. अर्ज 6 (ब) मा. भारत निवडणूक आयोगाच्‍या https://eci.gov.in/ या संकेतस्‍थळावर आणि मा. प्रधान सचिव तथा मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांचे https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्‍दतीने आधार क्रमांक भरण्‍यासाठी अर्ज 6 (ब) ERO NetGaruda Appnvsp आणि vha या माध्‍यमांवर देखील उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. मतदार त्‍याचा आधार क्रमांक सादर करण्‍यास असमर्थ असला तरी मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील नोंद वगळता येणार नाही. नमुना अर्ज 6  ब मध्‍ये नमुद केलेल्‍या 11 पर्यायी कागदपत्रापैकी कोणताही एक दस्‍तावेज सादर करता येईल. बीएलओ यांचेमार्फत घरोघरी भेट देऊन मतदाराकडून छापील नमुना अर्ज 6 ब भरून घेण्‍यात येणार आहेत. मतदाराकडून अर्ज 6  ब भरून घेण्‍याच्‍या अनुषंगाने 4 सप्‍टेबर 2022 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्‍यात येणार आहे असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...