Wednesday, July 27, 2022

 घरोघरी तिरंगा अभियानाचे आता

उत्स्फूर्त लोकसहभागातून लोकचळवळीत रूपांतर

-        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 ·        नांदेड प्रादेशिक परिवहन विभाग घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावला

·        जिल्ह्यातील वाहन वितरकही सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी तत्पर  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- ज्या व्यापक लढ्यातून देशाने स्वातंत्र्य मिळविले, देशासाठी अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढी पर्यंत पोहोचवले तर त्यांच्या मनात देशाप्रती अधिक कृतज्ञता निर्माण होईल. हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम केवळ देशभक्ती पुरता मर्यादित नाही तर आपल्या कर्तव्यालाही अधोरेखित करणारा उपक्रम आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. देशाप्रती आपली कृतज्ञता घरोघरी तिरंगा लावून व्यक्त करण्याची मिळालेली संधी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंब स्वयंस्फूर्त बजावेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

 

घरोघरी तिरंगा अभियानाला लोकचळवळीत रुपांतरीत करण्यासाठी नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील सर्व वितरक, वाहन प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरुपात पाच हजार कुटूंबा पर्यंत तिरंगा पोहोचविण्याच्या उपक्रमाचा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक शुभारंभ केला. सिडको येथील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या घरावर तिरंगा लावण्याची पहिल्यांदाच ही संधी प्रत्येकाला मिळाली आहे. घरोघरी तिरंगा पाठीमागे एक व्यापक भावना आहे. देशाप्रती कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता आपण लक्षात घेऊन जिल्ह्यातील 7 लाख 50 हजार घरे आपल्या घरावर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

प्रादेशिक परिवहन विभागाने घरोघरी तिरंगासाठी जी स्वयंस्फूर्त जबाबदारी स्विकारली आहे त्याचे कौतूक करावे वाटते. यात विशेष म्हणजे ज्या घरांना तिरंगा घेणे शक्य नाही अशा घरांसाठी सुमारे 5 हजार तिरंगा वाटण्याचे या विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे. हे पाच हजार तिरंगा त्यांनी माविम मार्फत समन्वय साधून बचतगटांमार्फत घेतल्याने आता या लोकचळवळीला बचतगटातील महिलांच्या श्रमाची जोड मिळाल्याचे गौरउद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काढले.

 

प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाील हा उपक्रम राबविण्याचे आम्ही ठरवले. यात अधिकाधिक लोकांचा सहभाग घेण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागामार्फत आम्हीही याचे महत्व नागरिकांना पटवून देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी 5 हजार ध्वज पुरवणाऱ्या बचत गटाला त्यांच्या मानधनाचा धनादेशही मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आला.        

00000






No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...