Saturday, June 5, 2021

 

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची

नामांकित कंपन्यांमध्ये निवड

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या संस्थेतील अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमधील सातत्याने निवडीची परंपरा यावर्षी देखील कायम राहिली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमी असताना सुद्धा शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये बजाज ऑटो, एल अँड टी, सिग्मा इलेक्ट्रिक, जनरल इलेक्ट्रिक, एन्डयुरन्स, इन्फोसिस आदि प्रसिद्ध कंपन्यांनी ऑनलाईन चाचणी व मुलाखतींचे आयोजन केले. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विविध शाखांच्या 220 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी 40 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे मिळाली असून उर्वरित विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्रे लवकरच प्राप्त होतील. मागील शैक्षणिक वर्षात देखील संस्थेच्या एकूण 209 विद्यार्थ्यांना विविध मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

 

संस्थेत सिव्हिल,  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन,  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी,  मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखेचा पदविका अभ्यासक्रम चालवला जात आहे. या सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांची कोअर इंडस्ट्री तसेच सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये निवड होत आहे. संस्था निवड करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कॅम्पस प्लेसमेंट हा ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकाचा महत्वाचा निकष असतो.  हे लक्षात ठेवून संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व आस्थापना विभाग अधिकारी एस. एम. कंधारे हे परिसर मुलाखतींसाठी अधिकाधिक नामवंत तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांना निमंत्रित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. नामवंत कंपन्यांकडून संस्थेच्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये 1.8 ते 2.5 लाखापर्यंत पॅकेजची नोकरी देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संस्थेत प्रवेश घेण्याकडे कल दिसून येतो. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...