Saturday, June 5, 2021

 

मृत्यूच्या भितीपेक्षा जीवनाचे मोल ओळखू यात  

ज्येष्ठांनो मनसोक्त निर्भीड जगा

-         डॉ. प्रभाकर देव         

नांदेड, दि. 5 (जिमाका) :-  अलिकडच्या दीड वर्षात सर्वाधिक घुसमट जी होत आहे ती मृत्यूच्या भयातूनच होत आहे. यातही सर्वाधिक भरडला जाणारा वर्ग हा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. कोरोना सारख्या घातक आजाराचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांनाच असल्याबाबत माध्यमातून अधिक भडीमार झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची मानसिक घालमेल अधिक झाली. आयुष्यभर असंख्य ऊन पावसाळे सुख-दु:खाचे प्रसंग झेलून उतरत्या वयात ही भयावहता अनेकांसाठी अत्यंत त्रासावून सोडणारी आहे. मृत्यू हा सर्वांगण सुंदर सोहळा आहे हे विसरुन चालणार नाही. आजच्या काळात ज्येष्ठांची होणारी मानसिक घालमेल समाजाने, कुटूंबातील प्रत्येकांनी निट समजून घ्यायला हवे या शब्दात ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांनी आजच्या भवतालाचे वास्तव समोर ठेवले. 

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने समाजात सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच या अभियानाच्या निमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांनी आपले भावविश्व व्यक्त करुन ज्येष्ठांना आश्वासकता दिली. 

ज्यांनी वयाची साठी ओलांडून ज्येष्ठांचा मान घेतला आहे त्यांनी मृत्यूच्या या भितीतून बाहेर पडायला हवे. एकदा मृत्यूचे मोल कळले की भिती आपोआप गळून जाते. रोज जगून भितीने मरण्यापेक्षा आजवर आपल्याला ज्या काही गोष्टी करता आल्या नाहीत त्या करुन पाहण्याचा प्रयत्न केला तर कोणतेच भय मनाला शिवणार नाही, असे डॉ. देव म्हणाले. इतिहासाच्या दृष्टिकोणातून आजच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहिले तर पूर्वीच्या काळातील भावविश्व अगोदर आपल्याला समजून घ्यावे लागेल. पन्नास वर्षापूर्वीचे जग आणि आजचे जग यात जमीन-आसमानचा फरक आता पडला आहे. यात भौतिक सोई-सुविधा असलेला वर्ग व ज्यांच्या पर्यंत कनेक्टिव्हिटी पोहचली नाही असा वर्ग या द्विस्तरावर विभागणी करावी लागेल. 

ज्यांची बोटे मोबाईलच्या स्क्रिनवर स्थिरावली आहेत त्यांना आता जगाचे अंतर राहिले नाही. जे व्यक्ती याचा जसा उपयोग करुन घेत आहेत ते भावविश्व प्रत्येकाला मिळत आहे. असंख्य ज्येष्ठ नागरिक आज या आजच्या कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहेत. पण ही कनेक्टिव्हिटी केवळ व्हॉटसॲप पुरतीच मर्यादित असेल आणि ठराविक चौकटितीलच असेल तर तुमचे भावविश्वही तेवढ्याच चौकटीत बंदीस्त होईल. या साऱ्या चौकटीच्या बाहेर पडून आजच्या काळात ज्येष्ठांना खूप काही वाचता येईल. अनेकांनी आपल्याला जसे जमेल तसे व त्या शब्दात लिहिण्यासाठी प्रयत्न केला पहिजे. आपण जे आयुष्य वेचले ते लिहिले पाहिजे. हा क्रम जर ज्येष्ठांनी निवडला तर कोरोनाच्या भयातून आपण केंव्हा भयमुक्त झालो हे लक्षातही येणार नाही. आजार होऊ नये याची काळजी घेतली तर भयमुक्तीचा मार्ग सहज मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आजही ग्रामीण भागामध्ये जिथे व ज्यांच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहचली नाही त्यांची स्थिती 50 वर्षापूर्वीचच आहे. या काळात ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली आले नाहीत. एक सश्रद्ध भावना त्यांच्यात असल्याने आत्मबलातून त्यांनी सुरक्षीततेला प्राधान्य दिले असावे. पूर्वीच्या काळी प्लेग, देवी सारख्या गावेच्या गावे उद्धवस्त करणाऱ्या साथी आल्या तेंव्हा माणुस हा सश्रद्धतेतूनच सावरला हे लक्षात घ्यावे लागेल. साथीच्या आजाराला देवपण देणारी भावना ही सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेला मंत्र होता, असे डॉ. देव यांनी स्पष्ट करुन त्याकाळातील मानसिक धैर्याचे विश्लेषण केले. भक्तीच्या मार्गात विवेक असला की माणसे सावरुन जातात हा आपला इतिहास विसरता येणार नाही. 

मानवी अस्तित्त्व हे पंचमहाभुताचा एक भाग आहे. जल, अग्नी, वायु, आकाश, पृथ्वी ही पाच तत्वे म्हणजे पंचमहाभूत अशी भारतीय तत्वचिंतनाची भूमिका आहे. कणाकणात ईश्वर आहे, प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. मृत्यू म्हणजे आपल्या मूळ अस्तित्त्वात एकरूप होणे आहे, मिसळणे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूची भिती काढून टाकण्यासाठी एवढे जरी समजून घेतले तरी  ते पुरेसे आहे. जो निसर्गाशी जवळ आहे, जो शेता-मातीत काम करणारा आहे तो आपल्या खेड्यापाड्यातील बांधव ह्या गोष्टी, हे तत्व चांगले समजून आहेत म्हणून तो भितीपासून दूर आहे. निर्भयता ही जीवनाला अर्थ देणारी गोष्ट आहे. वेळच मिळाला नाही हे ज्यांचे शब्द होते त्यांनी आतातरी निश्चिंत होऊन आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवून मनसोक्त जगावे असे डॉ. प्रभाकर देव यांनी सांगून ज्येष्ठांना नवे बळ दिले.  

*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...