Saturday, June 5, 2021

 

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी

त्यांच्या सोईच्या ठिकाणी लसीकरण केंद्र  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- राष्ट्रीय लसीकरणाच्या मोहिमेत दिव्यांग व्यक्ती तसेच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या कोविड-19 लसीकरण अधिक सोईचे व्हावे यादृष्टिने शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत. शासनाच्या या सूचनानुसार आता दिव्यांग व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वयोवृद्धांसाठी ग्रामीण भाग, शहरी भाग व महानगरपालिका भागात विशेष सोई उपलब्ध करुन दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. 

आरोग्य विभाग, सामान्य न्याय विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या परस्पर समन्वयातून त्या-त्या कार्यक्षेत्रात याबाबत नियोजन केले जात आहे. यात ग्रामीण पातळीवर कोविशिल्ड लसीच्या साठ्यांपैकी 10 टक्के लस ही यासाठी राखीव ठेवली जात आहे. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीच्या बैठकीत नियोजन केले जाईल. यात संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा यांच्यामार्फत हे लसीकरण यशस्वी केले जाईल. वैद्यकिय अधिकारी हे गावनिहाय लसीकरणाचे आयोजन करतील. दिव्यांग व वयोवृद्धांचे लसीकरण यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था, तालुका दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी घेतला जाईल. 

शहरी भागात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीची बैठक घेऊन त्यात वार्ड निहाय यादीसह सुक्ष्म कृती आराखडा तयार केला जाईल. वार्डनिहाय लसीकरणाचे आयोजन नगरपरिषद, नगरपालिका यांच्या समन्वयातून होईल. महानगरपालिका भागात समाज कल्याण अधिकारी आणि वैद्यकिय अधिकारी, शहरी प्राथमिक आरोग्य अधिकारी हे वार्डनिहाय दिव्यांगाची यादी करुन सुक्ष्म कृती आराखडा तयार करतील. दिव्यांग व वयोवृद्धांचे लसीकरण यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाईल. लसीकरण केंद्रासाठी त्या-त्या भागातील शाळा, समाज मंदिर, मनपा कार्यक्षेत्रात शहरी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांची निवड केली जाईल. सर्व लाभार्थ्यांची लसीकरण नोंदणी जागेवरच नोंदणी पद्धतीने पोर्टलवर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

*****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...