Monday, June 21, 2021

 

अर्धापूर येथे कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 21 :- खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्धापूर कृषी विभागाने अर्धापूर येथील शेतकरी सोनाजी सरवदे यांच्या शेतात कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वराबा सारी तंत्रज्ञान) मार्गदर्शन व बीबीएफ यंत्रद्वारे सोयाबीन पेरणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित केले होते. 

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चालवदे, उप विभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकार संजय चातरमल आदी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चलवदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाचे फायदे जसे 20-25 टक्के बियाण्याची बचत, उत्पादनात 25-30 टक्के हमखास वाढ, जीमीनीची धूप थांबवते, जास्तीचा पाऊस झाल्यास सारीद्वारे शेतातील पाणी बाहेर पडते व कमी पाउसाच्या काळात सरीमध्ये मुरलेल्या पाण्यामुळे पिके पाण्यासाठी तग धरू शकतात आदी बाबत मार्गदर्शन केले. 

कृषी सहाय्यक श्रीमती जरीकोटे यांनी त्यांच्या सज्जात किमान 800 हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाल्याचे सांगितल्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुक्यात गाव निहाय पुढील प्रमाणे कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

21 जून रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान,22 जून रोजी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान, 23 जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून रोजी कापूस एक गाव एक वाण / सुधारित भात लागवड तंत्रज्ञान / ऊस, लागवड तंत्रज्ञान व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान. 25 जून रोजी विकेल ते पिकेल अंतर्गत नाविन्यपूर्ण पिकाचे लागवड तंत्रज्ञान. 28 जून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार. 29 जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बैकेतील शेतकऱ्याचा सहभाग. 30 जून रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रनाच्या उपाययोजना. 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करुन कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

 यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात आज माळेगावच्या यात्रेला प्रारंभ   आज देवस्वारी व पालखी पूजन  नांदेड दि. २८ डिसेंबर : उद्या 29 डिसेंबर रोजी...