Thursday, February 11, 2021

लेख

 

महाराष्ट्र पर्यटन जागतिक नकाशावर 

            संपूर्ण जगातील देशांना पर्यटनाचे महत्व समजले आहे. मौजमजा याच्या  पुढे जाऊन सकारात्मक दूरगामी परिणाम करणारे क्षेत्र म्हणून पर्यटन क्षेत्राकडे जगातील सर्व देश पाहू लागले आहेत. मग ते स्थानिक  रोजगार निर्मिती असो  की पर्यावरण संतुलन  सांभाळत त्याचे जतन आणि संवर्धन असो, की कला संस्कृतीचे जतन संवर्धन असो, की कृषी सांस्कृतीक, ऐतिहासिक, नैसर्गिक, अध्यात्मिक, भौगोलिक, वारसा  जतन संवर्धन असो. या सर्व प्रकारच्या पर्यटनास महत्व आले आहे.

            भारतात दर वर्षी साधारण 1 कोटी विदेशी पर्यटक भारत दर्शनासाठी येत असतात. त्यातील 15 टक्के पर्यटक महराष्ट्रात मुंबई येथे उतरतात. या सर्व पर्यटकांनी दोन दिवस जादा थांबून महाराष्ट्र पहिला आणि पर्यटन केले तरी सुद्धा महाराष्ट्राला 12 हजार कोटी रुपये एवढे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. या संधीचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे, असे महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटत असेल. म्हणूनच कि काय सध्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारमधील पर्यटन विभागाने जणू कात टाकत काम हाती घेतले आहे.

            2019 पासून महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी काही ठळक योजना केल्या गेल्या आहेत.

            महाराष्ट्रात कुठलेही पर्यटन आणि आदरातिथ्य सेवा संदर्भात उद्योग सुरु  करण्यासाठी पुर्वी  70 च्या आसपास परवानग्या लागत होत्या. त्या सर्व कमी करून आता आवश्यक फक्त 10 परवानग्यांपर्यंत खाली आणून एक चांगला सपोर्ट केला आहे. यामुळे खाजगी पर्यटनक्षेत्रातील उद्योजगांसाठी हे क्षेत्र खुले झाले आहे. त्याचबरोबर पर्यटन आणि आदरातिथ्य सेवा संदर्भातील क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे इतर उद्योगक्षेत्राला जसे शासकीय लाभ मिळतात तसे लाभ या क्षेत्राला सुद्धा मिळतील.

            दुसरा महत्वाचा निर्णय काय असेल तर कृषी पर्यटन धोरण 2020. हे धोरण झाल्यामुळे संपूर्ण  महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीपूरक पर्यटन आपल्या शेतात करू शकतात  कोकणसाठी ही खूप चांगली बाब आहे की 1 एकर क्षेत्रातसुद्धा पर्यटन व्यवसाय करता येणार असल्यामुळे  कोकणातील शेतकरी मुंबईला नोकरीच्या मागे न धावता शेतावरच आधारित चांगले उत्पन्न मिळवू शकतो. एक कृषी पर्यटन प्रकल्प संपूर्ण गावातील घटकांना पूरक व्यवसायाचे जाळे निर्माण करू शकतो. महाराष्ट्रात सद्यस्थितीत 1 हजार कृषी पर्यटन केंद्र कार्यरत असून मागील आर्थिक वर्षात लाखो पर्यटकांनी भेट देत 53 कोटी रुपये एवढे आर्थिक उत्पन्न आंणि 13 हजार रोजगार  शेतकरी बंधू भगिनींना प्राप्त  झाले. एवढेच नाही तर स्थानिक महिलांना आणि युवकांना रोजगार, कृषी मालाला भाव तसेच गावातील कारागिरांना त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे.

            महाराष्ट्राला 700 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पण या सर्व स्त्रोतांचा म्हणावा तसा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकासहोताना दिसत न्हवता.

            जगभरातील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यावर असणारे शॅक्स (पर्यटन सिझनमध्ये छोटेखानी झोपडीवजा पर्यटन सेवा पुरवण्यासाठी तात्पुरती जागा) पर्यटकांना खूप मोहित करत असतात. परंतु महाराष्ट्रात तसे धोरण नसल्यामुळे कोकणातील पर्यटन उद्योजक हताश झाले होते. स्थानिक युवकांना या पर्यटन उद्योगात सामील करून घ्यायचे असेल तर त्यांना कमी खर्चिक पर्यटन उद्योग कसा उभारता येईल याकडे महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने लक्ष केंद्रीत करत बीच शॅक धोरण मंजूर करत स्थानिक युवकांना 80 टक्के रोजगार देण्यावर भर दिला आहे. ही संधी नक्कीच खूप आशादायी आहे.

            करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक एका पर्यटनस्थळावर खूप वेळ घालवत नाहीत असे निदर्शनास आले आहे. आणि स्वतः वाहन चालवत पर्यटन करीत आहेत. विदेशात कॅराव्हॅन पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात होत असते. एक चालते फिरते एका खोलीचे हॉटेलचं जणू. सर्व सेवा त्यामध्येच उपलब्ध असतात. ड्रायवर पाहिजे तर तो सुद्धा मिळतो. तसे नाविन्यपूर्ण मोटोहोम कॅराव्हॅन पर्यटन विभागाने सुरु करून एक आश्वासक  पाऊल टाकले असून त्याचे धोरणावर काम सध्या सुरु आहे.

            महाराष्ट्र ही वीरभूमी असून या राज्यात साहसी क्रीडा आणि खेळ यांना खूप महत्व आहे. तरुण पर्यटक याकडे आकर्षित करण्यासाठी शासनामार्फत साहसी पर्यटन धोरण लवकरच जाहीर केले जाईल.

            क्रिकेट आणि फिल्म्स : मुंबई ही सिनेमाची राजधानी आहे. तसेच येथे क्रिकेटही फार लोकप्रिय आहे  लंडनमध्ये पर्यटक जसे लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम पाहण्यासाठी जात असतात तसे मुंबईमध्ये आलेले पर्यटक वानखेडे स्टेडियम पाहण्यास जातील. म्हणूनच मुंबई क्रिकेट असोसिएशनबरोबर एमटीडीसीचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे क्रिकेटमध्ये घडलेल्या अनेक गोष्टी पर्यटकांना अनुभवण्यास मिळतील.

            हेरिटेज वॉक : मुंबईतील आर्किटेक्चरल वारसा असलेल्या इमारती फिरून पाहण्यास पर्यटकांना खूप आवडतात. त्यासाठी मुंबई महापालिकेबरोबर करार करून पर्यटन करण्यास सुरवात करत आहे. यामुळे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मुंबईच्या वारसा इमारती, त्याचे बांधकाम, नक्षी आणि इतिहास समजण्यास नक्कीच मदत होईल.

            ग्रेप पार्क, वाईन आणि बोट क्लब : नाशिक अँड वाईन असे आता समीकरण झाले आहे. त्यामुळे कॅलिफोर्निया आणि इटलीमध्ये तयार होणारी वाईनपेक्षा नाशिकची वाईनला पसंती देणारा पर्यटक वर्ग आपल्याकडे वाढीस लागला असून ते नाशिक वाईन टेस्टिंगसाठी येत आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील गंगापूर धरण खूप विशाल आहे. बोटींग आणि वॉटर स्पोर्ट्सला येथे खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. नाशिकला पर्यटन विभागाने अत्यंत चांगले पाऊल उचलून पर्यटन विकसीत केले आहे.

            खारघर येथे पर्यटन संकुल : एमटीडीसीने नवीन पर्यटन संकुल बांधून खारघर, नवी मुंबई येथे सुरुवात केले. त्या परिसरातील कॉपोरेट कंपन्या यांना आपले गेस्टसाठी खूप चांगली सोय यामुळे झाली आहे

            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नवीन बोध चिन्ह : काळानुरूप  एमटीडीसीने आपले बोधचिन्ह बदलले आहे. ट्रेंडी लूक असलेले त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि वारसा यामधून झळकतोय.

            न्याहरी निवास योजनेला चालना : या योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व पर्यटकांना उत्तम न्याहरी, निवास सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत निवास मालकांना मार्केटिंगमध्ये खूप अडचण येत होती. त्यामुळे न्याहरी निवास योजना मागे पडत चालली होती. होम स्टे आज जगभरातील पर्यटकांची पहिली पसंती असून महाराष्ट्रात पर्यटन विभागाने मार्केटिंगचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बुकिंग्स नक्कीच वाढतील

            लंडन आयच्या धरतीवर मुंबई आय तयार होणार आहे. दर वर्षी अंदाजे 50 लाख पर्यटक लंडन आयला भेट देतात. त्याचे महत्व समजून मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्र शासन मुंबई आय निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे.

            मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी समिती स्थापन : मुंबई  येथे संग्रहालय, वारसा, संस्कृती, फिल्म्स, क्रिकेट, दलाल स्ट्रीट, नाईट लाईफ, काला घोडा फेस्टिवल, एलिफंटा असे आणि बरेच पर्यटनदृष्ट्या प्रोमोशन करण्यासारखे आहे. त्याचे योग्य पद्धती नियोजन करून मार्केटिंग केले तर निश्चितपणाने पर्यटन वाढीस लागेल. त्यासाठी राज्य शासनामार्फत समिती स्थापन केली आहे.

            पर्यटन मंडळाकडील जागा ताज हॉटेलसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यातील पर्यटन वाढीस कसे लागेल यासाठी धोरणात्मक निर्णय करणे अपेक्षित असते, स्वतः पर्यटन प्रकल्प उभे करणे न्हवे. हे ओळखून कोकण विभागात पर्यटन विभागाकडे असलेल्या मोक्याच्या जमिनी खाजगी पर्यटन उद्योगांना देणे हिताचे आहे. त्यामुळे कोकणात पर्यटन नक्कीच वाढेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.

            "महाराष्ट्र टुरिझम - समथिंग फॉर एव्हरीवन" हा डेटा बेस तयार केला आहे. पर्यटकांना पर्यटनासाठी स्थळे, हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल एजन्ट, जेवण, इत्यादी माहिती एकत्रित असलेला डाटाबेस खूप महत्वाचा असतो. पर्यटन विभागाने नुकतेच असे संकलन करून प्रकशित केले आहे.

            या सर्वांचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रातील पर्यटन जगाच्या पर्यटन नकाशावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. एकंदरीत महाराष्ट्र पर्यटन विभागात अत्यंत वेगवान काम त्यादृष्टीने चालू आहे.

            - पांडुरंग तावरे (कृषी पर्यटनविषयक अभ्यासक, या क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठे कार्य)

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...