विकेल ते पिकेल धोरणातर्गंत जिल्हाधिकारी कार्यालयात
भाजीपाला व इतर शेती उत्पादनासाठी स्टॉल
▪ ग्राहकांसाठी शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला व फळांची विक्री
नांदेड, (जिमाका) दि. 11:- शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी शेतीशी निगडीत बाजार पेठ, ग्राहकांची मागणी व त्यानुसार शेतमालाचे उत्पादन हे गणित समजून घ्यावे लागेल. विकेल ते पिकेल या शासनाच्या धोरणानुसार असंख्य शेतकरी पुढे येत आहेत. ही समाधानाची बाब असून जिल्ह्यातील निवडक ठिकाणावर त्यांच्यासाठी स्टॉलस कसे उभारता येतील याबाबत प्रशासन स्तरावर विचार सुरु असून लवकरच जागेबाबत शक्य अशक्यता पडताळून घेऊ, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरुपात आज सुरु करण्यात आले आहे. यातील प्रातिनिधीक स्टॉलची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड शहरातील ग्राहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या विक्री केंद्रास भेटी देवून थेट शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करावा असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
विकेल ते पिकेल अभियानांतर्गंत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. आज प्रातिनिधिक स्वरुपात दुसऱ्यांदा हे स्टॉल लावण्यात आले आहेत. येथे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत नांदेड शहरातील ग्राहकांना ताजी फळे, भाजीपाला, वेगवेगळया प्रकारची मसाले, शेतमालावर महिला बचतगटांने प्रक्रिया करुन केलेले नवनवीन पदार्थ खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामधील एक स्टॉल हा 100 टक्के सेंद्रीय उत्पादित शेतमालाचा आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील विक्री केंद्राचे
उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कृष्णा
जोमेगावकर व विठोबा शेतकरी गटाचे प्रवृत्तक एकनाथ पावडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक
उद्घाटन करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment