Thursday, February 11, 2021

 कृपया लेख प्रसिद्धीबाबत

सामुहिक जबाबदारी स्विकारली तरच

रस्त्यावरील वाहतुकीसह आपण राहू सुरक्षित 

रस्ते अपघात हे राष्ट्रीय स्तरावरील चिंतेचे एक प्रमुख कारण ठरले आहे. रस्ते अपघातावरील एका जागतिक अभ्यासगटाच्या अहवालानुसार जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी 11 टक्के मृत्यू एकट्या भारत देशात होतात. दुर्दैवाने आपला भारत देश हा रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत जगात पहिला देश ठरला आहे. यावर्षीच्या रस्ते अपघात अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात व तेवढेच नागरिक जखमी होतात. या अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दीड लाखाच्या वर आहे. म्हणजेच एका दिवशी आपल्या देशात 414 नागरिक मृत्यू पावतात. तर दर तासाला रस्ते अपघातात सुमारे 17 नागरिक आपला जीव गमावून बसतात. या अपघातांमध्ये 18 ते 60 वर्षे या वयोगटातील नागरिकांचे प्रमाण 84 टक्के असणे ही बाब ‍अधिक वेदनादायी आहे. आपल्या घरातील कमावती व्यक्ती अपघातात मृत्यू पावल्याने या व्यक्तींच्या कुटुंबियांना मोठ्या आर्थिक, सामाजिक व मानसिक संकटांना सामोरे जावे लागते. किंबहुना राष्ट्राच्या लोकसांख्यिय लाभांश (Demographic Dividend) न मिळता देशाच्या आर्थिक प्रगतीस खीळ बसते.

या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी व नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी देश पातळीवर रस्ते सुरक्षा अभियान दरवर्षी राबवले जाते. यावर्षी सुद्धा 32 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दिनांक 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र शासनाने दरवर्षी रस्ते अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करून येत्या पाच वर्षात अपघाती मृत्यूंची संख्या निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे व त्या दिशेने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

अपघात मुक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वप्रथम अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करून झालेल्या अपघातांची कारणमीमांसा करणे आवश्यक ठरते.गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातांचे विश्लेषण केले असता ही कारणे साधारणतः चार गटांमध्ये वर्गीकृत केली जाऊ शकतात.

1. मानवी चुका

2. रस्त्यामधील दोष

3. वाहनातील तांत्रिक दोष

4.सभोवतालची परिस्थिती 

रस्ते अपघातांमध्ये मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण साहजिकच सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, विनापरवाना वाहन चालवणे, वाहन चालवताना विहित सुरक्षा साधनांचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे अशा मानवी चुका या गटात समाविष्ट होतात. शासनाने विहित केलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवण्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक 67 टक्के आहे. सध्या वाहननिर्मात्यांकडून अधिकाधिक इंजिनक्षमतेची वाहने बाजारात आणली जात आहेत. त्यातच भर म्हणून वाहनचालकांचा चांगल्या रस्त्यांवर, प्रामुख्याने महामार्गांवर अति वेगाने गाडी चालवत वाहनांवरील नियंत्रण सुटते व त्याची परिणीती अपघातात होते. मद्यप्राशन करून वाहन चालवण्यामुळे (drunk and drive) होणाऱ्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण 3.5 टक्के आहे. चुकीच्या दिशेने  (wrong side) वाहन चालवणे हेही तितकेच धोकादायक! सहा टक्के अपघात हे चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यामुळे होतात. अलीकडच्या काळात वाहन चालवताना मोबाईल वर संभाषण केल्यामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. मोबाईल वापरामुळे होणाऱ्या रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण 3.3 टक्के आहे. त्याचप्रकारे रस्त्यांवर वाहन चालवताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न केल्याने अपघात होणाऱ्या जीवित हानीची शक्यता अनेक पटींनी वाढते. गेल्या वर्षात  रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट न वापरण्यामुळे 44666 दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे प्रमाण एकूण अपघाती मृत्यूच्या तब्बल 29.82 टक्के आहे. यावरून  दुचाकी चालवताना हेल्मेट वापर न करणे किती धोकादायक ठरू शकते याची कल्पना येते. चारचाकी वाहनांच्या बाबतीत सीटबेल्ट चा वापर न केल्यामुळे गतवर्षी 20885 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे प्रमाण एकूण अपघाती मृत्यूंच्या 13.82 टक्के आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अपघात टाळू शकत नसला तरी अपघातामुळे होणारी संभाव्य नुकसान नक्कीच टाळू शकतो. ट्रॅफिक सिग्नल चे पालन न करणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे,प्रवासी वाहनांमध्ये विशेषत: स्कूलव्हॅन मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेल्यामुळे वाहनावरचा ताबा सुटून अपघाताची शक्यता असते. वेळोवेळी दिलेल्या वाहतूकविषयक सूचनांचे पालन न करणे अशा इतर कारणांमुळे देखील मोठ्या प्रमाणावर अपघात होतात.

मालवाहू वाहनांमध्ये भारितक्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक (overloading) करणे हे अपघातांना आमंत्रण देणारे ठरते. ओवरलोडींग केल्याने टायर फुटणे, वाहनांचे ब्रेक न लागणे, वाहनांसोबत रस्त्याचेही नुकसान होणे, वाहन पलटी होणे या सर्वांची परिणीती जीवघेण्या अपघातात होते. रस्ते अपघातांच्या एकूण आठ टक्के अपघात ओव्हरलोडेड वाहनांमुळे होतात त्यामुळे ओवरलोडींग टाळणे केव्हाही श्रेयस्कर ठरते.

मानवी घटकांप्रमाणेच सभोवतालची परिस्थिती देखील काही प्रमाणात अपघातास कारणीभूत ठरते. आसपासच्या वातावरणाचा देखील अपघातास हातभार लागतो. पावसाळी वातावरण, कमी सूर्यप्रकाश असणे, धुक्याची परिस्थिती अशा घटकांचा परिणाम वाहतुकीवर होतो. वाहन चालवत असताना अचानकपणे समोर आलेल्या पादचारी,शाळकरी मुले तसेच जनावरे यांच्यामुळे देखील अपघात घडण्याची शक्यता असते. घडलेल्या एकूण अपघातापैकी निवासी भागात 19 टक्के, संस्थात्मक भागात 7 टक्के, व्यवसायिक भागात 14 टक्के तर सर्वाधिक म्हणजे 67 टक्के अपघात हे खुल्या भागात घडले आहेत. राष्ट्रीय महामार्गांची लांबी एकूण रस्त्यांच्या दोन टक्के एवढी असली तरी तेथे घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातात पैकी 36 टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करणे हे एक आव्हान आहे. महामार्गांचे प्रमाण एकूण रस्त्यांपैकी तीन टक्के असून तेथे एकूण अपघात आणि पैकी 25 टक्के अपघात घडलेले आहेत. एकूण एकूण अपघातापैकी शहरी भागात 32 टक्के तर ग्रामीण भागात 68 टक्के अपघात घडलेले आहेत. म्हणजेच रस्ते अपघात ही केवळ शहरी समस्या नसून पूर्ण देशव्यापी समस्या ठरते.

देशातील रस्ते अपघातांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध आघाड्यांवर काम करत आहे. त्याकरिता रस्तेसुरक्षेची चतुःसूत्रीचा अर्थात चार E's चा वापर शासन स्तरावर केला जात आहे. हे चार E's म्हणजे - Engineering , Education, Enforcement आणि Emergency care. या चतुःसूत्रीतील इंजिनिअरिंग (Engineering) या E मध्ये रस्ते सुधारणा व वाहनांमधील तांत्रिक दोष या कारणांमुळे होणाऱ्या अपघातांचे कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांचा समावेश होतो. रस्ते सुधारणांमध्ये वारंवार अपघात होणाऱ्या क्षेत्रांचे अर्थात ब्लॅक स्पॉट्सचे निर्धारण करून शास्त्रोक्त पद्धतीने या ब्लॅक स्पॉट्स  मध्ये सुधारणा करून तेथे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यात साठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने IRAD integrated (Integrated Road Accident Database) उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक जिल्हयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून जिल्हयातील अपघात प्रवण क्षेत्रांचे(ब्लॅक स्पॉट) निर्धारण करून त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. परिवहन विभाग, पोलीस विभाग,सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची एक संयुक्त समिती मार्फत अपघाताचे शास्त्रोक्त विश्लेषण करून भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रोड रंबलर्स, स्पीड ब्रेक्रर्स, वेग मर्यादा फलक तसेच इतर आवश्यक रस्ते सुरधारणाविषयक उपाययोजना केल्या जात आहेत. वाहन सुधारणांच्या बाबतीत नव्याने बाजारात येणाऱ्या वाहनांसाठी एबीएस (अंटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम), डे लाइट सिस्टीम, अति वेगात वाहन जात असताना अलर्ट सिस्टिम प्रणाली तसेच एअरबॅगस् बंधनकारक करण्यात येऊन वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व्यवसायिक वाहनांमध्ये व्हीकल ट्रॅकिंग सिस्टम प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे.

रस्ते सुरक्षा चतुःसूत्रीतील दुसरा E म्हणजे Enforcement अर्थात अंमलबजावणी. रस्ते वाहतूक विषयक नियमांची पायमल्ली करणाऱ्या दोषी वाहनचालकांवर केलेल्या कारवाईचा यात समावेश होतो. रस्ते सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने बेशिस्त वाहनचालकांवर जरब बसावा याकरिता परिवहन विभाग तसेच वाहतूक पोलीस यांच्याकडून दोषींवर कारवाई केली जाते. नवीन मोटार वाहन (सुधारणा) कायद्यात रस्ते वाहतूक विषयक नियम मोडणाऱ्या चालकांना मोठ्या दंडाची तरतूद केली गेली आहे. या कायद्यात किमान दंडाची रक्कम वाढवून पाचशे रुपये करण्यात आलेली आहे. अल्पवयीन वाहन चालकांना आळा बसण्यासाठी कडक तरतूद करण्यात आली आहे.‍ अतीवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे,धोकादायकरीतीने वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, अशा गुन्ह्यांच्या बाबतीत वाहनचालक परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. मोटर वाहन कायदा विषयक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या वायुवेग पथकांना अधिक बळकट करण्यासाठी ई चालान अत्याधुनिक प्रणालीचा वापर येत आहे.

तिसरा E म्हणजे Education. रस्त्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाला सुरक्षित वाहतुकीसाठी अधिकाधिक संवेदनशील यासाठीच्या प्रयत्नांचा समावेश या E मध्ये होतो. दरवर्षी देशभरात रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते. शाळेतील विद्यार्थी वाहन चालक, वाहतूकदार संघटना, मोटर ड्रायव्हिंग स्कूलस् या रस्ते सुरक्षेशी संबंधित असलेल्या घटकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. रस्ते वाहतूक नियमांविषयी विविध जनजागृतीपर पथनाट्ये,  चर्चासत्रे,व्याख्याने आयोजित केली जातात. याक्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच लोकसहभागातून विविध स्पर्धा आयोजीत केल्या जातात. रस्तासुरक्षा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांचा गौरव केला जातो. सध्या चालू असलेले रस्ता सुरक्षा अभियान म्हणजे याच प्रयत्नांचा एक भाग !

सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा E म्हणजे Emergency care अर्थात आपत्कालीन सेवा. अपघात होऊ नये याकरीता काळजी घेऊन देखील झालेल्या रस्ते अपघातप्रसंगी जखमींना वेळीच व आवश्यक उपचार देऊन संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक प्रयत्न या आपत्कालीन सेवेमध्ये मोडतात. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी याकरिता रस्ते अपघात निधीची तरतूद व अपघात समयी गोल्डन वर (Golden Hour) मध्ये जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी धावणाऱ्या व्यक्तींना अर्थात Good samaritans यांना पाठबळ येणे आवश्यक ठरते. नव्याने आलेल्या मोटार वाहन (सुधारणा) कायद्यात अपघातग्रस्तांना मदती निधीची तरतूद Good Samaratins यांना पाठबळ दिले गेलेले आहे. हिट ॲण्ड रन प्रकरणांमध्ये मृत्यू पावलेल्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या नुकसान भरपाईची तरतुद आहे. रस्ते अपघातसमयी कार्य करणाऱ्या व्यक्तीला संभाव्य कायदेशीर त्रासापासून संरक्षण करण्यासंबंधी देखील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

देशातील रस्ते अपघातांना आळा घालण्याचे ध्येय ठेवून केंद्र शासन व राज्य शासन वरील चतुःसूत्रीवर काम करत असून विविध आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. परंतु त्यातील प्रमुख भागधारक (stakeholder) असलेल्या देशातील नागरिकांच्या सहभागाशिवाय हे प्रयत्न निरर्थक आहेत. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ठरते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे की, जगात अपेक्षित असलेला बदल आधी स्वतः मध्ये घडवा (Be the change you wish to see in the world) या उक्तीप्रमाणेच वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात सुद्धा आपण सर्वांनी स्वतःपासून करावी. संबंधित यंत्रणांनी दिलेल्या साध्यासोप्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आपल्यापैकी  प्रत्येकाने असे केल्यास देश अपघात मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. आणि असे घडल्यास खऱ्या अर्थाने रस्ते सुरक्षा अभियान राबवण्याचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल !

अनंत रामराजे भोसले,

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,नांदेड



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...