Sunday, March 8, 2020


सुरक्षा पेनच्या माध्यमातून महिलांना मदत ;
महिला सुरक्षा आपल्या सर्वांची जबाबदारी
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
           
नांदेड , दि. 8 :- समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुरक्षा पेनच्या माध्यमातून महिलांना स्वत: बरोबर अतिरिक्त मदत मिळणार असून महिला सुरक्षा ही शासनाबरोबर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.     
            जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा महिला दक्षता समिती व जिल्हा पोलिस दलाच्यावतीने नांदेड वजिराबाद पोलीस स्टेशन परिसरात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.  
 यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती दिक्षाताई धबाले, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती सुशिलाताई बेटमोगरकर, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, सभापती सती देशमुख तरोडेकर, कौटूबिंक न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती स्वाती चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपाधीक्ष दत्ताराम राठोड, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शोभा वाघमारे, विद्याताई पाटील, स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, नागरिक, महिला, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देवून पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे वैचारिकदृष्ट्या अग्रेसर असून राज्यात पास्कोचा कायदा लवकरच लागू करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महिलांना सुरक्षा पेन दिल्याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन करुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सुरक्षा पेनमधील दूरध्वनी क्रमांक संकटकाळी खूप महत्वाचा आहे. महिलांनी निर्भय, मुक्तपणे जीवन जगत असतांना आयुष्यातील उद्दिष्ट गाठण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत. लवकरच महिला सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन स्थापन करण्यात येणार असून तेथे अधिकारी, कर्मचारी या महिला असणार आहेत, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
मुलगी जगायला पाहिजे
आयुष्यात जन्मासाठी आई पाहिजे, राखी बांधायला बहिण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरण-पोळी भरवायला मामी पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे, हे सर्व करायच्या आधी मुलगी जगायला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.  
याप्रसंगी महिला व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सुरक्षा पेनचे वितरण करण्यात आले. सुरक्षा पेनमध्ये पोलीस दलातील अनेक अधिकारी, पोलीस ठाणे व महिला मदत केंद्राचे संपर्क क्रमांक आहेत अडचणीच्या काळात या पेनचा महिला व मुलींना सुरक्षा मिळविण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) चे विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ पथनाट्य सादर केले.

निर्भया वॉकला नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद
जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण, सुरक्षा व अन्य मुद्यांवर जनजागृती करण्याच्या हेतूने पोलीस दलाच्यावतीने काढण्यात आलेल्या निर्भया वॉकला नांदेडकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय चौक, महात्मा ज्योतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन निर्भया वॉकला प्रारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा वॉक महात्मा गांधी पुतळयाजवळ समाप्त करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरक्षा पेनचे वितरण करण्यात आले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...