Thursday, March 12, 2020


कोरोना विषाणु संसर्ग : प्रतिबंधात्मक उपाययोजना
विभागांनी पार पाडावयांच्या जबाबदाऱ्या निश्चित
                           जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश
नांदेड दि. 12 :- आंतराष्ट्रीय स्‍तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणुबाधित रुग्‍ण आढळत आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरुन आणि देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्‍यामुळे हा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणे व विषाणु संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणे व विषाणुंचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. सदर संशयित रुग्‍णामुळे आपत्‍तीजनक परिस्थिती नांदेड जिल्‍हयात उद्भवू नये यासाठी जिल्‍हयात आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 लागु झाल्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.  
पूर्वतयारी व प्रत्‍यक्ष अंमलबजावणीसाठी कोरोना आजाराचे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. एन. आय. भोसीकर यांचा मोबाईल क्र 9890130465 व जिल्हा परिषदेचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे मोबाईल क्र. 9970054408 यांना संनियंत्रक म्‍हणुन घोषित करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार प्रत्‍येक विभागाने आपल्‍या अधिनस्‍त अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
गृह विभाग नांदेड पोलिस अधिक्षक : परदेशातुन आलेल्‍या नागरीकांची माहिती संकलित करावी. ज्‍या हॉटेलमध्‍ये व नातेवाईकांकडे नागरीक मुक्‍कामास आहेत किंवा कसे त्‍यांची माहिती एकत्रित करुन जिल्‍हा रुग्‍णालयास कळवावी. कोरोना विषाणु संसर्गाबाबत सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातुन अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्‍य ती कार्यवाही  सायबर सेल मार्फत तसेच अफवांवर नियंत्रण ठेवावे. कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेवर आधारित प्रमाणित कार्यपध्‍दती तयार करावी. ज्‍या हॉटेलमध्‍ये विदेशी नागरीक व प्रदेशावरुन येणारे नागरीक मुक्‍कामी असतील त्‍या ठिकाणी भेटी देऊन खात्री करुन घ्‍यावी. गर्दीच्‍या ठिकाणी आवश्‍यक प्रमाणावर स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन जनजागृती करावी व त्‍यांचे सहकार्य घ्‍यावे. परदेशी नागरीक अथवा परदेशातुन प्रवास करुन आलेले भारतीय नागरीक याबाबत संबंधित पोलिस स्‍टेशन प्रभारी यांना आयसी यांना माहिती वेळोवेळी देण्‍याच्‍या सुचना दयाव्‍यात. शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करु नये अथवा परावृत्‍त करावे. आपल्‍या अधिनस्‍त अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. जिल्‍हा रुग्‍णालयाशी समन्‍वय ठेवावा.
आरोग्‍य विभाग नांदेड जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी :  कोरोना विषाणुचा संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपध्‍दती तयार करावी. कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्‍हयात वाढू नये यासाठी उपाययोजना आखण्‍यात यावी. कोरोना विषाणुच्या संसर्गबाबत आरोग्‍य विभागाने तयार केलेल्‍या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन करावे व सदर माहिती पुस्तिकांचे वितरण करावे. स्‍वतंत्र वैदयकिय पथके तयार करुन पुर्ण वेळ तैनात यथोचित कार्यवाही करण्‍यात येईल. संशयित रुग्‍णांचा पोलीस विभाग व सेवाभावी संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन तपास घ्‍यावा. खाजगी रुग्‍णालये सहकार्य करीत नसल्‍यास त्‍यांच्यावर योग्‍य ती कार्यवाही करावी. नमूद परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील विविध रुग्‍णालये / दवाखाने यांना योग्‍य ते निर्देश वेळोवेळी देण्‍यात येऊन त्‍यांची अंमलबजावणीबाबत योग्‍य ती कार्यवाही करावी. आपल्‍या अधिनस्‍त अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. आवश्‍यक औषधसाठा उपलब्‍ध करावा. गर्दीच्‍या ठिकाणी जनजागृती करावी. कॉरटाईन आणि आयसोलेशन युनिट स्‍थापन करावे. यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्‍ती करावी. कोरोना विषाणुसंबंधी नियंत्रण कक्ष स्‍थापन करावे. जिल्‍हा आणि तालुकास्‍तरावर नियंत्रण कक्ष स्‍थापन करावे तथा याबाबत वेळोवेळी संदेश प्रसारीत करावे. अफवा किंवा खोटे संदेश प्रसारीत करीत असल्‍यास त्‍यांच्‍या विरुध्‍द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. हात धुण्‍याचे सेनिटाईझर्स आणि फेसमास्‍कची काळा बाजार करणाऱ्यांविरुध्‍द कार्यवाही करण्‍यात यावी.
महानगरपालिका / नगरपालिका मनपा आयुक्‍त, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय जिल्‍हा प्रशासन अधिकारी नगरपालिका / नगरपरिषदेचे सर्व मुख्‍याधिकारी : आपल्‍या अधिनस्‍त रुग्‍णालये यांचे मार्फत जनजागृती करण्‍यात यावी. वार्ड निहाय स्‍वच्‍छता ठेवावी. केरकचरा साचणार नाही याची दक्षता घ्‍यावी. तसेच सार्वजनिक शौचालयाची स्‍वच्‍छता ठेवावी. कॉरटाईन आयसोलेशन  युनिट स्‍थापन करावे. राज्‍यस्‍तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 राष्‍ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-239 78046 या क्रमांकाची माहिती सर्वसामान्‍य नागरीकापर्यंत  जिल्‍हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत प्रसिध्‍दी देण्‍यात यावी. औषध विक्रेते यांनी जास्‍त भावाने  मास्‍क विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत  चुकीचे समज पसरवणे इ. बाब निदर्शनास आल्‍यास तात्‍काळ  आयसी  यांना माहिती दयावी. स्‍वतंत्र वैद्यकिय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी. नागरीकांमध्‍ये खबरदारीची उपाययोजना योग्‍य ती जागृती प्रचार प्रसिध्‍दी देण्‍यात यावी. मदत केंद्र माहिती केंद्र  तात्‍काळ आपल्‍या विभगामार्फत 24 तास सुरू करावे. यासाठी स्‍वंतत्र नोंडल अधिकारी यांची नियुक्‍ती करावी. आपले कार्यक्षेत्रातील रेल्‍वे परिसर, बस स्‍टॅंण्‍ड, मॉल, चित्रपटगृहे/नाटयगृहे, स्‍वयंचलित  जिने येथे स्‍वच्‍छता ठेवावी. संशयित रुग्णांसाठी स्‍वतंत्र अॅम्‍बुलन्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. कोरोना विषाणूचा संसर्ग माहितीसाठी स्‍वतंत्र जिल्‍हा नियंत्रण कक्ष मदत केंद्राची स्‍थापना करावी. मदत केंद्र माहिती केंद्र  तात्‍काळ आपल्‍या विभागामार्फत 24 तास सुरू ठेवावे. या माहिती केंद्रात पूर्णवेळ मनुष्‍यबळ उपलब्‍ध करून दयावे. राज्‍यस्‍तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्‍य नागरीकापर्यंत  जिल्‍हा माहिती अधिकारी नांदेड यांचे मार्फत प्रसिध्‍दी देण्‍यात यावी. दैनंदिन प्रगतीचा अहवाल जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करावा. विमान तळावरून प्रवाश्यांबदलची माहिती आरोग्‍य विभागास उपलब्‍ध होते त्‍यानूसार नांदेड जिल्‍हयातील रुग्‍णांचा शोध घेऊन निरीक्षणाखाली ठेवावे त्‍याबदलचा अहवाल जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करावा. औषध विक्रेते यांनी जास्‍त भावाने मास्‍क विक्री, औषधाची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे इ. बाब निदर्शनास आल्‍यास अन्‍न औंषध प्रशासनामार्फत  योग्‍य ती कार्यवाही तात्‍काळ करावी. आवश्‍यकतेनूसार खाजगी डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहीत करणे तसेच खाजगी हॉस्‍पीटल  मधील साधन सामुग्री अधिग्रहीत करण्‍याचे अधिकार देण्‍यात येत आहे. जिंगल्‍स, हस्‍तपत्रिका , पोस्‍टर, स्‍टीकर यांचे माध्‍यमातून जनजागृती करावी. शासनाने  वेळेावेळी दिलेल्‍या सुचनांचे पालन  करावे व कार्यवाही करावी. हे निर्देश आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदयातील कलम 30 अन्‍वये दिलेले असल्‍याने त्‍याचे पालन करणे सबंधीत प्रवासी यांना बंधनकारक आहे. त्‍याचे पालन  करण्‍यात बाधा  निर्माण करणा-या  कोणत्‍याही  व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदयाच्‍या कलम 51, 55, 56 व 57 नूसार कार्यवाही करण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी. उदवाहक यांची स्‍वच्‍छता  ही ठराविक वेळेनंतर करणे बाबत  सुचना निर्गमित  करणे     त्‍याचे पालन करण्यासाठी जबाबदार अधिकारी नेमणे.
जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्‍यमिक यांनी आपल्‍या अधिनस्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्रामार्फत जनजागृती करण्‍यात यावी. ग्रामस्‍तरावर स्‍वच्‍छता ठेवावी. केरकचरा साचनार नाही याची दक्षता घ्‍यावी. राज्‍यस्‍तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 -26127394 राष्‍ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-239 78046 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्‍य नागरीकापर्यंत  जिल्‍हा माहिती अधिकारी नांदेड यांचे मार्फत प्रसिध्‍दी देण्‍यात यावी. स्‍वतंत्र वैदयकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी. नागरीकांमध्‍ये खबरदारीची उपाययोजना योग्‍य ती जनजागृती प्रचार प्रसिध्‍दी देण्‍यात यावी. यासाठी स्‍वतंत्र नोंडल अधिकारी यांची नियुक्‍ती करावी. प्रमाणित कार्यपध्‍दती तयार करावी. आरोग्‍य  विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण मार्गदर्शन करावे. मदत केंद्र माहिती केंद्र तात्‍काळ आपल्‍या विभागामार्फत 24 तास सुरू करावे. अंगणवाडी शाळांमध्‍ये या बाबतचे प्रबोधन करावे. शाळांमध्‍ये स्‍नेहसंमेलना  सारखे कार्यक्रम आयोजित करू नये. शाळा सुरू होणेपुर्वी एकत्रित प्रार्थना घेऊ नये. शाळा संपल्‍यानंतर वर्गातील मुले टप्‍या-टप्‍याने सोडण्‍यात यावीत. सहलीचे आयोजन करू नये.
महसूल विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार : तालुकास्‍तरावर सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून जनजागृती करावी. आपले कार्यक्षेत्रात सर्व बंधीत यंत्रणांशी समन्‍वय ठेवून आवश्‍यक त्‍या उपाय योजना कराव्‍यात. विविध संस्‍था, संघटना व्‍यक्‍तीकडून  प्राप्‍त मदतीने परदेशीय  नागरीकांची माहिती संकलीत करावी, सदर माहिती जिल्‍हा रुग्‍णालय नांदेड  यांना कळवावी. कायदा   सुव्‍यवस्‍थेवर लक्ष ठेवावे. राज्‍यस्‍तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 -26127394 या क्रमांकाची माहिती सर्व सामान्‍य नागरीकापर्यंत  जिल्‍हा माहिती अधिकारी, नांदेड यांचे मार्फत प्रसिध्‍दी  देण्‍यात यावी.
अन्‍न प्रशासन विभागाचे सहआयुक्‍त, अन्‍न प्रशासन विभागाने : औषध विक्रेते यांनी जास्‍त भावाने मास्‍क विक्री,  औषधाची  साठेबाजी,  संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणे आदी बाब निदर्शनास आल्‍यास तात्‍काळ  आयसी  यांना माहिती दयावी. योग्‍य कार्यवाही करावी. सर्व औषध विक्रेते दुकानाची तपासणी करण्‍यात यावी. त्‍यांचे माध्‍यमातून नागरीकांमध्‍ये जनजागृती करण्‍यात यावी . औषध विक्रेत्‍यांना अधिक किमतीत औषधे विकण्‍याची जाणीव करून दयावी. कोरोना संसर्गाबाबत औषध विक्रेत्‍यांनी जनजागृती करावी. औषध विक्रेत्‍यांना समन्‍वय बैठकीचे आयोजन करावे.
कोरोना व्‍हायरसमुळे बाधित रुग्‍णांसाठी खाटा राखीव ठेवण्यासाठी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व  जिल्‍हा समन्‍वयक महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, वैदयकिय अधिक्षक (सर्व)  महात्‍मा फुले जन-आरोग्‍य योजनेशी संलग्नित असलेल्‍या प्रत्‍येक रुग्‍णालयात खाटा व्‍हेंटिलेटरच्‍या सुविधेसह राखीव ठेवण्‍यात याव्‍यात. जिल्‍हा रुग्‍णालय, स्‍त्री रुग्‍णालय व प्रत्‍येक उपजिल्‍हा आणि ग्रामिण रुग्‍णालयात पाच खाटांचे Isolation Ward तयार करण्‍यात याव्‍यात.
Quarantine महानगरपालिका नांदेड  उपायुक्‍त नांदेड वाघाळा  शहर महानगरपालिका नांदेड वैद्यकिय आरोग्‍य अधिकारी नांदेड वाघाळा  शहर कोरोना व्‍हॉयरसमुळे बाधित रुग्‍णांना Quarantine करिता पुरुषांसाठी नाना-नानी पार्क जवळील सुधाकरराव डोईफोडे हॉल व स्त्रियांकरीता विनायकनगर मनपा दवाखाना राखिव ठेवण्‍यात यावा. सर्व तहसीलदार, वैदयकिय अधिक्षक,तालुका आरोग्‍य अधिकारी, तालुक्‍याला सुध्‍दा कोरोना व्‍हॉयरसमुळे बाधित रुग्‍णांना Quarantine करिता शाळा मंगल कार्यालयाची जागा निश्चित करण्‍यात यावी व अहवाल दिनांक 13 मार्च 2020 पर्यंत सादर करावा.
लक्षणानुरुप रुग्‍णांचे विलगीकरण जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, सर्व संबंधित वैद्यकीय अधिक्षकांनी बाधित रुग्‍णात आढळुन येणाऱ्या लक्षणानुरुप रुग्‍णांचे विलगीकरण करण्‍यात यावे व खालीलप्रमाणे रुग्‍णालयात औषधोपचार करण्‍यात यावेत. सौम्‍य लक्षणे किंवा संशयित रुग्‍ण अथवा कोरोनाबाधित रुग्‍णांचा संपर्क आलेल्‍या व्‍यक्‍तींचा औषधोपचार जिल्‍हा रुग्‍णालय, स्‍त्री रुग्‍णालय, सर्व उपजिल्‍हा रुग्‍णालये व ग्रामिण रुग्‍णालये येथे करण्‍यात यावे.
जिल्‍हा समन्‍वयक, महात्‍मा फुले जन-आरोग्‍य योजना तसेच संबंधित रुग्‍णालयाचे संचालक यांनी आजारांचे गंभीर लक्षणे असलेले संशयित रुग्‍ण व ज्‍यांच्‍या Throat Swab चा अहवाल अद्याप अप्राप्‍त आहे अशा रुग्‍णांचा औषधोपचार महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेशी संलग्नित व धर्मदाय रुग्‍णालयात करण्‍यात यावा.
डॉ. शंकरराव चव्‍हाण शासकिय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्‍ठाता यांनी Throat Swab चा अहवाल Positive  आलेले व गंभीर अवस्‍थेतील रुग्‍ण यांचा औषधोपचार डॉ. शंकरराव चव्‍हान शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्‍णुपुरी नांदेड येथे करण्‍यात यावा.
सर्व विभागांनी जबाबदारीच्‍या अनुषंगाने वेळोवेळी आवश्‍यक ती कार्यवाही करावी दैनंदिन अहवाल नांदेड जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांना सादर करावा. कोरोना  विषाणू  संसर्गाबाबत  जिल्‍हयातील सर्व विभागाकडून प्राप्‍त होणाऱ्या दैनंदिन अहवालाची एकत्रित माहिती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक नांदेड यांनी  जिल्‍हाधिकारी यांचे अवलोकनार्थ सादर करणार आहेत. तसेच सदर विषयांबाबत वेळोवेळी आवश्‍यकतेनूसार बैठकांचे आयोजन करून त्‍याबाबत संबंधीतांना अवगत करावे. जिल्‍हाधिकारी यांच्‍या मान्‍यतेने शासनास अहवाल सादर करुन नमूद सुचनांचे तंतोतंत पालन करावे अन्‍यथा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005  अंतर्गत कलम 51, 55, 56 व 57 नूसार कार्यवाही करण्‍यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी दिले आहेत.
0000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...