गुलाबी बोंडअळी निर्मुलन व किटकनाशके
हाताळणी कार्यशाळा
नांदेड,
दि. 3:- नांदेड जिल्ह्यातील कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे त्याचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कृषि विभाग जिल्हा
परिषद नांदेडच्यावतीने गुलाबी बोंडअळी निर्मुलन व किटकनाशके हाताळणीबाबत
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेबाबतची सविस्तर प्रस्तावना व उद्देश कृषि विकास अधिकारी संतोष नादरे
यांनी विषद केला.
या कार्यशाळेमध्ये कापूस पिकावरील बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बेग, श्री. पंडागळे, कृषि विज्ञान
केंद्राचे श्री. देशमुख यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच सिंजेन्टा कंपनीचे श्री. सरोदे यांनी फेरोमन ट्रॅप व किटकनाशक सुरक्षा
किटचे प्रात्यक्षिक दाखविले.
गुलाबी बोंडअळीचे निर्मुलन
करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात यावी. या मोहीमेमध्ये
ग्राम स्तरावरील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचा सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन अति.
मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले.
सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील यांची टिम करुन प्रत्येक गावामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात
यावे. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ
यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे , असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले.
गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान होऊ
नये या विषयाची सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी. प्रतिबंधात्मक औषधी कृषि
विद्यापीठाने शिफारस केलेली आहे त्याचाच वापर करण्यात यावा. त्याच प्रमाणे गुलाबी
बोंडअळीच्या निर्मुलनाबाबतची सविस्तर सूचना कृषि विभागाने दिलेली आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात
यावी व तालुका स्तरावर दि.06 ऑगस्ट, 2018 रोजी तसेच ग्राम पंचायत स्तरावर दि.10 ऑगस्ट, 2018 रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी
कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि
अधिकारी विनायक सरदेशपांडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहीम अधिकारी अनिल शिरफुले, जिल्हा कृषि अधिकारी संभाजी कऱ्हाळे, कृषि अधिकारी गजानन हुंडेकर व कृषि अधिकारी विश्वास अधापूरे तसेच कृषि विभागातील सर्व
अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment