Monday, April 9, 2018

वझ्झर मतिमंद बालगृहाप्रमाणे

जिल्ह्यात बालगृहे सुरु व्हावीत

- अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील

नांदेड , ‍दि. 9 :- वझ्झर येथील मतिमंद बालगृहाचे मॉडेल नांदेड जिल्ह्यासाठी उत्कृष्ट असून अशी मतिमंद बालगृहे जिल्ह्यात सुरु व्हावीत, असे मत अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी व्यक्त केले. नेरली कुष्ठधाम येथे मराठवाडा लोकसेवा मंडळ नेरली नांदेड संचलित "नंदनवन" प्रौढ मतिमंद निवासी कृषी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पाटील बोलत होते.

प्रौढ मतिमंद निवासी कृषी कार्यशाळेचे उद्घाटन अमरावती येथील अंबादासपंत वैद्य मतिमंद बालगृह वझ्झरचे संचालक शंकर बाबा पापळकर यांचे हस्ते रविवार 8 एप्रिल रोजी करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे होते. सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्रीमती प्रणीता श्रीनिवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल कदम, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर, लंगर साहेब गुरुद्वाराचे संतबाबा अमरजितसिंघजी, रामनारायण काबरा, नारायण चन्नावार, सदाशिवराव पाटील, डॉ. एस. पी. गायकवाड, बनारसीदास अग्रवाल, पुरुषोत्तम खेमका, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. शिला कदम, डॉ. एल. एम. बजाज, विजय मालपाणी, राजेश लोटीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, प्रौढ मतीमंद निवासी कृषी कार्यशाळेच्या जागेचा उपयोग मतिमंद बालगृहासाठी व्हावा. या चांगल्या उपक्रमासाठी शासनामार्फत संस्थेला सर्वतोपरी मदत केली जाईल. अपंग शाळेच्या संस्थापक मंडळांनी या उपक्रमाची माहिती घेऊन तो राबवावा, असे आवाहन केले.

अमरावतीला मतिमंदासाठी केलेले काम नांदेड येथे करण्याची इच्छा व्यक्त करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, जीवन हे निसर्गाने दिलेले सुंदर रुप असून मतिमंद दिव्यांगासाठी 18 वर्षानंतर पुढे काय हा विचार महत्वाचा आहे. वझ्झर येथील बालगृहातील अनाथांकडे पाहून प्रेरणा मिळाली. तेथील मंतिमंद मुले स्वत:ची कामे स्वत: करुन वृक्षांना जगवण्याचे काम करतात. जागा नसतांना वनवासी ठिकाणी दिव्यांग, मतिमंद मुलांसाठी शंकरबाबांनी आयुष्य वेचले. त्यांचे मार्गदर्शन नांदेडकर प्रत्यक्षात साकारतील. दिव्यांगाना मदत प्रतिष्ठेसाठी न करता मनातून करा. मतिमंदांची निवासी कृषी कार्यशाळा माझे दुसरे घर असून या सेवाकार्यासाठी प्रशासनाकडून सर्व ती मदत केली जाईल. अनेक व्यवसायिक मुकबधिर, मतिमंदाना काम देऊन त्यांचे जीवन उभे करण्याचे काम करत आहेत. नंदनवन परिसरात आयुर्वेद वृक्षाची लागवड केल्यास उत्पन्नाबरोबर औषधी, फळे, निसर्गरम्य वातावरण मिळेल असे सांगून येथील रस्त्याचे काम तात्काळ सुरु होणार असल्याची माहिती दिली.

अपंगाची काशी म्हणून नांदेडची ओळख व्हावी

शंकरबाबा पापळकर यांनी सोप्या शब्दात संवाद साधला ते म्हणाले, नांदेड ही श्री गुरुगोविंदसिंघजीची नगरी असून अपंगाची काशी म्हणून नांदेडची ओळख निर्माण झाली पाहिजे, यासाठी आत्मविश्वासाने कार्य करा. पंढरपुरला एका वर्षाच्या अनाथ अंध मुलाच्या शिक्षणासाठी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पालकत्व स्विकारुन केलेली मदत न विसरण्यासारखी आहे. हाताच्या रेषेवर भाग्य घडत नाही त्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. वझ्झरला अनेक मतिमंद मुलींचे विवाह केली असून वीस हजार वृक्षांची लागवड केली आहे. यासाठी जास्त काम करावे लागेल तरच हे काम पुढे जाऊ शकेल. अपंगाच्या सेवेसाठी फोन आला पाहिजे, असे मोठे कार्य करा अशी सुचना केली. होशमध्ये राहण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या. सन 1954 मध्ये संत गाडगेबाबांनी दिलेली घोंगडी खादांवर कायम राहते. त्यातून मला कार्याची ऊर्जा मिळते असे सांगून पापळकर म्हणाले, प्रौढ मतिमंदाची कृषी कार्यशाळा पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांसह माध्यम प्रतिनिधींना बोलवा. त्यातून विविध सुचना, मार्गदर्शन मिळेल. जिल्हाधिकारी डोंगरे यांनी एका अनाथ मुकबधीर मुलीच्या विवाह प्रसंगी मामा या नात्याने केलेल्या मदतीतून मुलीला सौभाग्य मिळून दिल्याचे सांगितले. मतिमंद मुलं 18 वर्षानंतर बालगृहातून बाहेर पडल्यानंतर ते सुखा-समाधानाने राहतील यासाठी कायदा झाला पाहिजे. समाजाने या मतिमंद मुलांवर लक्ष ठेवावे. त्यांना माणुस बनविण्याचे काम मी केले आपला आर्शिवाद त्यांना देत जा, असे आवाहन केले. वझ्झर येथे मतिमंद बालगृहात सन्मानाने जगत असलेल्या अनाथ मुलांची माहिती दिली. अनाथ, मतीमंदाच्या जीवन प्रवासातील अनेक प्रसंग भावनांना स्पर्श करुन सांगितल्या.

बाबा अमरजितसिंघजी म्हणाले, आपण एकाच वृक्षाची मुलं असून येथे लहान-मोठा असा भेद नाही. गरीबांची सेवा दिपाप्रमाणे मोठी आहे. आनंद हा गुरुच्या चरणी प्राप्त होतो. चांगले-वाईट कर्म नेहमी आपल्या सोबत असतात. महात्मा गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे अनुभव सांगून मनात प्रेरणा निर्माण करा त्यातून जीवनाचा विकास होतो. संस्थेच्या कामाची व्यापकता देशभर पोहचेल यासाठी येथे आल्यानंतर जाण्याचे मन होऊ नये असे काम होत राहो, असे सांगितले.

सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्रीमती श्रीनिवार म्हणाले, सेवाभावी संस्थेने सेवेचा भाव ठेवून गरजुंना सेवा उपलब्ध करुन द्यावी. अपंगत्व हा शाप नसून त्याकडे पाहण्याचा समजाचा दृष्टिकोन बदला आहे. त्यांना विशेष व्यक्ती म्हणणे संबोधले जात आहे. त्यांचेमध्ये मोठी इच्छा शक्ती असून यासाठी मानसिक मनोबल मोठे आहे. स्वत:चे दैनंदिन काम करता येत नाही, असे स्टिफन हॉकिंग यांनी विज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांनी वंचित घटकांच्या संगोपनासाठी संस्थेमार्फत अखंडीतपणे काम सुरु राहील, असे सांगितले. प्रौढ मतिमंद निवासी कृषि कार्यशाळेबाबत डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी माहिती दिली तर आभार डॉ. हंसराज वैद्य यांनी मानले.

कार्यकारणीस प्रौढ मतीमंद निवासी कृषी कार्यशाळेच्या संकल्पनेची शपथ शंकरबाबा पापळकर यांनी दिली. एम. आर. जाधव यांनी शंकरबाबा यांचा परिचय करुन दिला. या समारंभास दिव्यांग, अनाथ मुलं, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, नागरीक आदी उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...