Wednesday, February 14, 2018


ईईएसएलसोबत नगर विकास विभागाचा सामंजस्य करार
ऊर्जा बचतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील
पथदिवे एलईडीवर आणणार
                                                                    -- मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 14: ऊर्जा बचतीसाठी राज्यातील  सर्व महानगरपालिका,नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे  एलईडीवर आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
            महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरचे जुने पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) व नगरविकास विभाग यांच्यात आज सामंजस्य करार श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा म्हैसकर, ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभकुमार उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले, नगरविकास विभागातर्फे केलेल्या अमृत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची दखलकेंद्रशासनाने घेतली. एलईडी पथदिव्यांचे  काम उत्तम दर्जाचे व्हावे. डिसेंबर 2018 पर्यत हे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी ईईएसएल ला दिली.
            या सामंजस्य करारानुसार ईईएसएलच्या स्ट्रीट लाईटिंग नॅशनल प्रोग्रॅम अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सुमारे 20 लाख एलईडी दिवे लावले जातील. यामधुन 500 मेगावॅट वीज बचत होणार असून वीज बिलात किमान 50 टक्कयांनी घट होणार आहे.
            नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील सुमारे 394 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना टप्प्या-टप्याने या योजनेचा लाभ मिळेल. या प्रकल्प अंतर्गत सध्याचे सोडियम व्हेपर, मर्क्युरी व्हेपर दिवे बदलून तिथे एलईडी दिवे लावले जातील. तसेच या दिव्यांची पुढील सात वर्षे देखभाल केली जाईल. या योजनेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड यासारखी प्रमुख शहरे समाविष्ट असतील.
            या करारानुसार, रस्त्यावरील एलईडी दिव्यांचा पुरवठा करणे, बसविणे, सुरू करणे तसेच दिवे बसवल्यानंतरची देखभाल दुरुस्ती आणि वॉरंटी कालावधीतील अदलाबदल यासह सेवा आणि देखभाल पुरवणे अशी संपूर्ण जबाबदारी ईईएसएलने घेतली आहे.
            अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ईईएसएलने यशस्वीरित्या केलेल्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...