Monday, February 12, 2018


कृषी विज्ञान केंद्रांनी
शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करावे  
- राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड, दि. 12 :- शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून आणि शेतीमधील नवनवीन बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.   
केंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेंतर्गत आणि सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या "कृषीवेद" या नूतन इमारतीचे तसेच कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सगरोळी ता. बिलोली येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवप्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचीन काळापासून भारत देश कृषीप्रधान असल्याचे सांगत राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले की, आपला देश अन्नजैवविविधता संपन्न होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे होते. 95 टक्के जनता शेती व शेती निगडीत व्यवसायामध्ये होती. 17 व्या शतकापर्यंत देश जल व्यवस्थापन व इतर क्षेत्रामध्ये अग्रेसर होता. इंग्रजांच्या काळात देशातील कृषीक्षेत्राला नुकसान पोहोचले. त्यामुळे शेतकरी गरीब झाला मात्र गेल्या कालखंडात देशाने हरीत क्रांती करीत पुन्हा उभारी घेतली व शेतीचे क्षेत्र अधिक भक्कम होत गेले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगून यासाठी देशातील शेतकऱ्यांबरोबरच कृषी विज्ञान केंद्रांनी मोठे योगदान दिले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले. शेतीमधील नवनवीन बदल आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. शासनाच्या कृषी विषयक योजना खूप आहेत. त्याचाही लाभ पोहोचेल असा प्रयत्न कृषी विज्ञान केंद्रांनी करावा असे सांगून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेतीपुरक व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले.
सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषीवर आधारीत उद्योग-व्यवसाय सुरु करुन रोजगाराचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन करतांनाच राज्यपाल यांनी युवकांना कौशल्य विकासाचे महत्व सांगितले.
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घ्यावे व प्रात्यक्षिकातून ज्ञान मिळावावे. यामुळे आपली शेती अधिक समृद्ध करता येईल. हा विश्वास मनाशी बाळगावा, असे सांगून त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.
प्रारंभी आमदार सुभाष साबणे आणि संस्थेचे संचालक सुनिल देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी संस्थेच्या आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, कृषी व पर्यावरण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या भरीव कार्याविषयी माहिती दिली. कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा माहिती व साहित्याची प्रदर्शनी मांडण्यात आली असून हा महोत्सव 14 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले.
तलावाची पाहणी
शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जि. प. लघुपाटबंधारे विभागामार्फत सगरोळी येथील मालगुजारी तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यावेळी केली. शिवकालिन असलेल्या या तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर राहणार असून यासाठी 1 लाख 20 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू यांनी दिली. यावेळी राज्यपालांनी कृषी विज्ञान केंद्राच्या इमारती मधील सुविधांची व पिक प्रात्यक्षिकाचीही पाहणी केली.
000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...