Thursday, January 18, 2018

नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफ ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली, 18 : नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ याला यंदाचा (वर्ष 2017) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील 18 बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ इजाज अब्दुल रौफ चा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.
नांदेड जिल्हयातील पार्डी (मक्ता) येथील इजाज अब्दुल रौफ ने धाडस दाखवून 2 मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले, त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 30 एप्रिल 2017 ला पार्डी गावातील काही महिला व मुली  येथील बंधा-यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणींने पाण्यात उड़ी घेतली. मात्र, 2 हजार फुट लांब, 60 फुट रूंद आणि 20 फुट खोल अशा बंधा-यात ती ही बुडायला लागली. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उड़ी घेतली मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडू  लागल्या. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून  लोक तलावावर मदतीसाठी गेले. यावेळी  शेताकडे निघालेल्या इजाज अब्दुल रौफ ने बंधा-या जवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली. त्याने  प्रसंगवधान व धाडस दाखवून पाण्यात उड़ी घेतली . 20 फुट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण  वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यू झाला.
नदाफ इजाज अब्दुल रौफ हा पार्डी येथील  राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात १० व्या वर्गात शिकत असून  भारतीय लष्करात रूजू होऊन देशाची सेवा करायची आहे असे त्याने सांगितले.
प्रसंगी कठीण साहस दाखवून दोन मुलींचे प्राण वाचविणाऱ्या इजाज अब्दुलच्या या साहसी कार्यामुळे पंचक्रोशीत त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या साहसाची नोंद घेत देशातील सर्वोच्च बाल शौर्य पुरस्कारासाने  प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते त्याचा सन्मान होणार आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी ला राजपथावर होणा-या पथसंचलनातही तो सहभागी होणार आहे.
            7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना  वर्ष 2017 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यामध्ये 3 बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चार श्रेणींमध्ये देण्यात येणा-या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.

००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...