Thursday, January 18, 2018

73 व 74 व्या घटना दुरुस्तीमुळे   
सर्वसामान्यांचा स्थानिक विकासात आणि नियोजनात सहभाग 
नांदेड दि. 18 :-  सर्वसामान्य माणसाला विकास काम व नियोजनात सहभाग देणारा कायदा 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे प्राप्त झाला, असा सूर बुधवार 17 जानेवारी रोजी व्यक्त झाला. निमित्त होते 73 व 74 या घटना दुरुस्तीस 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त "लोकशाही निवडणूक व सुशासन" या विषयावरील व्याख्यानात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्याची विभागीय परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सर्व समावेश प्रशासन प्रामुख्याने महिला व दुर्बल घटकांसाठी कसे करता येईल, आवश्यक त्या निवडणूक सुधारणा या विषयांवर व्याख्याने व खुले चर्चा सत्राचे आयोजन तीन सत्रात करण्यात आले होते.
या परिषदेस स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार, महापौर शीलाताई भवरे, जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे उपायुक्‍त पारस बोथरा, उपायुक्‍त वर्षा ठाकूर, निवडणूक विभागाचे अवर सचिव रीना फणसेकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशेाक शिनगारे, परभणीचे मनपा आयुक्‍त राहुल रेखावार, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्‍त गणेश देशमुख, उपजिल्‍हाधिकारी अनुराधा ढालकरी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदींची व्‍यासपीठावर यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेत नांदेड मनपाचे माजी महापौर शैलजा स्वामी यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीची स्थापना करण्यात आली. विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्थापन करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे सांगितले.   
लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा कणा म्हणून ओळखल्या जाते. याला घटनात्मक दर्जा व सर्वसमावेशकता देण्याचे कार्य 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीने केले आहे. या परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्य करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिशा देतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक विकासावर होतो, असे मत त्यांनी मांडले.
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शोभा वाघमारे यांनी भारतातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि प्रगल्भ करण्यासाठी दैनंदिन राजकारणाचे स्त्रियांवर होणारे परिणाम हे फार महत्वाचे ठरतात. स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आधार आहेत. देशातील लोकशाहीचा विकास याच संस्थांवर अवलंबून असतो. त्यामुळे या संस्थांनी जनतेप्रती जबाबदार राहून काम केले पाहिजे, असे सांगितले.
लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, गाव विकासाच्या समस्या या गावपातळीवर सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायती स्वावलंबी झाल्या पाहिजेत. भारत देश आयटीक्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगून त्यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील शेळगावकर म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न समजणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, व्यावसायाला चालना देण्यात यावी. निवडणूक कालावधीतील व्यवस्था दर्जेदार करण्याविषयी माहिती दिली. मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदान तसेच मतदान केंद्र याबाबत माहिती दिली. औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी नगरसचिव एम. ए. पठाण यांनी नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधीत कायदा आणि नगररचना अधिनियमामधील तरतुदींची माहिती दिली.
देगलूर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बालाजी कत्तूरवार म्हणाले, 73 व्या घटना दुरुस्तीच्या क्रांतिकारी निर्णयामुळे मागासवर्गीय समाज व महिलांना पंचायती राज संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक प्रक्रियेपासून ते ग्रामीण विकासाच्या विविध योजना फलदायी होण्यासाठी सर्वप्रथम लोकप्रतिनिधी व लोकसेवकांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन होणे आवश्यक आहे असे सांगितले.
73 व 74 व्या घटनादुरुस्तीस 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी भोजन समिती देगलूर उपविभागीय अधिकारी व्ही. एल. कोळी, आयोजन समिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, डाक्युमेंटशन समिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. केशव देशमुख, प्रसिध्दी समिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम , वक्ता नियोजन समिती नांदेड तहसीलदार श्रीमती संतोषी देवकुळे, स्टॉल प्रदर्शनी समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, स्वागत समिती कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, निमंत्रण पत्रिका समिती तहसीलदार ए. पी. त्रिभुवन , रजिस्ट्रेशन (नोंदणी) समिती तहसीलदार श्रीमती उज्वला पांगरकर आदि अधिकारी / कर्मचारी यांनी परिषदेच्या आयोजनाबाबत परिश्रम घेतले.
या विभागीय परिषदेचा समारोप खुल्या चर्चासत्रानंतर करण्यात आला. सुत्रसंचलन पिपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ए. एन. सिध्देवाड यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी मानले.
   
***

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...