Wednesday, September 27, 2017

दहावी, बारावी परीक्षेचे
संभाव्य वेळापत्रक जाहीर  
नांदेड दि. 27 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये आयोजित केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतुने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे तयार करण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम) लेखी परीक्षा बुधवार 21 फेब्रुवारी ते मंगळवार 20 मार्च 2018 या कलावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा गुरुवार 1 मार्च ते शनिवार 24 मार्च 2018 या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.
परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतीम राहील. छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपुर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...