Friday, January 6, 2017

   
पत्रकारितेसमोरच्या आव्हानांवर मात करण्यासाठी
तत्वनिष्ठा, प्रामाणिकपणा यातूनच बळ मिळेल
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणदिन निमित्त अभिवादन
नांदेड, दि. 6:-  पत्रकारितेसमोर आव्हाने येतच असतात. पण या आव्हांनावर मात करण्यासाठी तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा याद्वारेच पत्रकारांना बळ मिळेल, असा सूर आज येथे व्यक्त झाला. निमित्त होते, दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम होते.
एमजीएम शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, ज्येष्ठ पत्रकार सु. मा. कुलकर्णी, गोविंद मुंडकर, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॅा. गीता लाटकर, महाविद्यालयाचे ग्रंथपाल गोविंद हंबर्डे, वृत्तपत्र विद्या माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गणेश जोशी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. कदम यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची तत्त्वनिष्ठा ते देशातील अलिकडच्या काळापर्यंतच्या तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी पत्रकारितेच्या गौरवपुर्ण वाटचालीचा उल्लेख केला. तत्त्वनिष्ठा, सत्य तीच बातमी आणि बातमीत सत्य असायलाच हवे या धारणेबाबत श्री. कदम यांनी भाष्य केले.
ज्येष्ठ पत्रकार श्री. कुलकर्णी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात सदैव विद्यार्थ्याच्या भुमिकेत राहण्याने, ज्ञानार्जनाची आस बाळगावी लागते. पत्रकारितेत टिकण्यासाठी नेहमीच शिकण्याची भुमिका ठेवावी लागते, असे सांगितले. पोलीस उपअधीक्षक श्री. बनकर यांनी पत्रकारितेतील नवे प्रवाह आणि माध्यम क्षेत्रासमोर टाकलेली आव्हानांवर प्रकाश टाकला. पत्रकारिता आणि प्रशासनादरम्यानच्या विश्वासार्हतेतून लोकाभिमुख सेवा देता येते, यावर त्यांनी भर दिला. ज्येष्ठ पत्रकार प्रा. तुंगार यांनी दर्पणकार आचार्य जांभेकर यांचे जीवन वृत्त उलगडून दाखविले, तसेच वृत्त लेखन आणि वृत्तपत्रांसाठीच्या लेखनातील वैविध्य यावर मार्गदर्शन केले. मराठी भाषेचे सौंदर्य आणि व्याकरणाचे महत्त्व प्रा. तुंगार यानी विशद केले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. गवळी आणि पत्रकार मुंडकर यांचीही समयोचित भाषणे झाली.

सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेल्या स्पंदन भित्तीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राचार्य डॅा. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद आदींचीही उपस्थिती होती. पत्रकार भारत दाढेल यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. पी. डी. सेलूकर, प्रा. सतिश वाघरे, प्रा. राज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. छाया नाग्रतवार यांनी आभार मानले.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...