Thursday, November 17, 2016

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर कॅमेऱ्यांची नजर, चोख पोलीस बंदोबस्त मतदान साहित्य आज रवाना होणार

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर
कॅमेऱ्यांची नजर, चोख पोलीस बंदोबस्त
मतदान साहित्य आज रवाना होणार
नांदेड, दि. 17 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून सज्जता करण्यात येत आहे. मतदानासाठी उद्या शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी मतदान साहित्य रवाना होणार आहे. मतदान प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी पुरेश्या पोलीस बंदोबस्तासह, मतदान  प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याची काटेकोर व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे. निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील या सर्व प्रक्रियेबाबत वारंवार आढावा घेत आहेत.
 निवडणुकीसाठी शनिवारी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत मतदान होईल. निवडणुकीसाठी शुक्रवार 18 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान साहित्य रवाना करण्यात येईल. मतदानासाठी पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने विहीत केलेले ओळखपत्र तसेच प्राधिकारी संस्थेचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. मतदानासाठी पसंती क्रमाची मतदान पद्धती असल्याने, मतदारांना उमेदवाराच्या छायाचित्रासह असलेल्या मतपत्रिकेवर पसंती क्रमांक अंकात नोंदवावा लागणार आहे. मतदान पद्धतीबाबत मतदारांना विहीत प्रक्रिया अवगत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मतपत्रिका आणि मतदान याबाबतची सर्व प्रक्रिया गुप्त मतदान प्रक्रियेनुसार काटेकोरपणे अंमलात आणली जाणार आहे.
मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 472 मतदार पात्र आहेत. त्यामध्ये 227 मतदार पुरूष तर 245 मतदार स्त्रिया आहेत. आठही मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी आणि एक क्षेत्रीय अधिकारी अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली अनुषांगीक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतदानानंतर मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जमा करून, त्याकडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. बचत भवन येथेच मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी आठ वाजता सुरु होईल.
गोपनीय मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता
मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर त्या-त्या प्राधिकारी संस्थांचे महिला व पुरुष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  याशिवाय मतदान केंद्राच्या आत व बाहेरही व्हिडीओ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.  
मतदान केंद्रात मतदाराला केवळ ओळखपत्र नेता येणार आहे. त्याशिवाय पेन, मोबाईल किंवा अन्य कोणतेही उपकरण, साहित्य, कागद आदी साहित्य नेता येणार नाही. मतपत्रिकेवर मत पसंती क्रमांक नोंदविण्यासाठी निवडणूक विभागाकडूनच जांभळ्या रंगाच्या शाईचे पेन पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांना तपासणीत अन्य साहित्य बाहेर ठेवावे लागेल. याची नोंद घेऊन, मतदारांनी मतदानासाठी जाताना विहीत केलेल्या ओळखपत्राशिवाय अन्य कोणतीही गोष्ट बाळगू नये, असे आवाहन निवडणूक कार्यालयाने केले आहे.
मतदान केंद्र व संलग्न प्राधिकारी संस्था
मतदान केंद्रांची यादी मतदान केंद्राचे ठिकाण, केंद्र ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीचे नाव,  त्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव अशा क्रमाने पुढीलप्रमाणे.
नांदेड- तहसील कार्यालय नांदेड : जिल्‍हा परिषद नांदेड  (सर्व पं.स. सभापतीसह) नांदेड वाघाळा मनपा व नगर पंचायत अर्धापूर. किनवट- तहसील कार्यालय किनवट :  नगर पंचायत माहूर व नगर परिषद किनवट. हदगाव- तहसील कार्यालय हदगाव :  नगर पंचायत हिमायतनगर व नगर परिषद हदगाव. भोकर- तहसील कार्यालय भोकर : नगर परिषद भोकर व नगर परिषद मुदखेड. कंधार- तहसील कार्यालय कंधार :  नगर परिषद लोहा व नगर परिषद कंधार. धर्माबाद- तहसील कार्यालय धर्माबाद : नगर परिषद उमरी व  नगर परिषद धर्माबाद. बिलोली- तहसील कार्यालय बिलोली : नगर पंचायत नायगाव, नगर परिषद कुंडलवाडी व नगर परिषद बिलोली. देगलूर- तहसील कार्यालय देगलूर : नगर परिषद देगलूर व नगर परिषद, मुखेड.  
000000


No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...