Sunday, October 30, 2016

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौडमध्ये विविध घटकांचा सहभाग ;
सरदार पटेल यांना अभिवादन
नांदेड दि. 31 – विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्षवेधले.
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर एकता दौड मार्गस्थ झाली. दौडमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, मनपा सहाय्यक आयुक्त संतोष कंदेवाड, जिल्हा‍ क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, तहसिलदार अरविंद नरसीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी सहभागी होते.
पोलीस अधीक्षक ऐनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते वजिराबाद मार्केट रस्ता, महावीर चौक, जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने पथक जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0000000


Saturday, October 29, 2016

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द
नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात विधान परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे जिल्ह्यात 14 ऑक्टोंबर पासून आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे बुधवार 2 नोव्हेंबर 2016 रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवार म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात येतो.

0000000
नांदेड विधापरिषदेसाठी
दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल
नांदेड, दि. 29 :- महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2016  साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज दोन उमेदवाराने तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयातील नामनिर्देशन कक्षाकडून देण्यात आली.
नामनिर्देशनपत्रे देण्याचा व स्विकारण्याचा आज चौथा दिवस होता. यात आज अमरनाथ आनंतराव राजूरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर गजानन श्रीराम पवार यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.   

00000000
महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने
रावळकर कुटुंबियांना 3 लाख रुपयांची आर्थीक मदत
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते वितरीत
        नांदेड, दि. 29 :- अवयवदानामुळे अजरामर झालेल्या सुधीर रावळकर यांच्या पत्नी तिलोत्तमा रावळकर व मुलगी श्रृती यांना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते 3 लाख रुपयांची आर्थीक मदत आज देण्यात आली. श्री. काकाणी यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन सांत्वन केले. महसूल अधिकारी, कर्मचारी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगीतले.
      
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ही आर्थिक मदत सुधीरची मुलगी श्रृतीच्या नावे मुदत ठेवीमध्ये देण्यात आली. यावेळी सुधीरची आई रुक्मीणी प्रल्हादराव रावळकर, बहीण चंदा रावळकर, शोभा रावळकर, लता कल्याणकर, भाच्ची जान्हवी डांगे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार अरुणा संगेवार, अरविंद नरसीकर, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कुणाल जगताप, राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण नरमवार, तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष एन. जी. कानगुले, राज्य उपाध्यक्ष एम. एम. काकडे, महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
           रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मोठा प्रतिसाद  देवून रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत स्वत: स्वयंस्फुर्तीने दिली आहे. यावेळी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी खंबिरपणे आम्ही उभे आहोत असा विश्वास दिल्याने त्यांना एक मायेचा आधार मिळाला आहे.

000000

Friday, October 28, 2016

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीचे
नामनिर्देशनपत्रे 1 नोव्हेंबर रोजी स्वीकारले जाणार
        नांदेड, दि. 28 महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2016 साठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर 2016 आहे. अधिनियमातील तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर 2016 रोजीची सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु ठेवणे आवश्यक आहे. अशा सूचना उपसचिव व सह. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत.  म्हणून नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2016 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील असे नांदेड जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
         शासन राजपत्र 24 नोव्हेंबर 2015 अन्वये शासनाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी शासकीय, निमशासकीय, कार्यालयांना भाऊबीज निमित्त सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी पराक्रम्य संलेख अधिनियम 1981 खाली जाहीर केले नाही.  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1991 मधील नियम 33 मध्ये नामनिर्देशन पत्र सादर करणे आणि विधीग्राह्य नामनिर्देशन याबाबत तरतूद दिली असून त्याखालील दिलेल्या परंतुकामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशनपत्र जो दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे, त्या दिवशी सादर करता येणार नाहीत अशी तरतूद आहे. अधिनियमातील व्याख्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी याची व्याख्या दिली असून त्यात सार्वजनिक सुट्टी म्हणजे पराक्राम्य संलेख अधिनियम, 1981 मधील कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी अशी आहे.  या तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर रोजी सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु राहणार आहे.  

00000000
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी
4 नोव्हेंबर पासून सुरु होणार
नांदेड, दि. 28 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबर 2016 रोजी पासून विद्यार्थ्यांना शिकवणी सुरु होणार आहे, अशी माहिती प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी दिली आहे.  
शाळेतील संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व नातेवाईकांनी आपल्या पाल्यास 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. शाळेत येताना सोबत सुट्टीपुर्वी दिलेले पालक बॉयोडाटा व पालकांचे ओळखपत्र पूर्ण करुन घेवून यावे, असे आवाहनही केले आहे.

00000000
कापूस, तुर पिकावरील किड नियंत्रणासाठी
कृषि विभागाचा संदेश
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यात कापूस व तूर पिकासाठी किड, रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिकावरील किडीच्या संरक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी संदेश दिला आहे.
कापसावरील फुले येणाच्या व बोंडे निर्मितीच्या अवस्थेत जर पाने लाल पडत असतील तर मॅग्नेशिअम सल्फेट 0.2 टक्के @ 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरीता डायफेनथुरिऑन 50 डब्लु. पी. 1.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरामधील तुरीसाठी लिंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रती हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
आरोग्य शिबीरात 118 रुग्णांची तपासणी 
नांदेड, दि. 28 :-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यातीने आज हनुमानगड नांदेड येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात 118 रुग्णांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक आरोग्य व नेत्र इत्यादी आजाराची मोफत तपासणी करण्यात आली.
तपासणीत मधुमेहाचे 10, उच्चरक्तदाब 8, मौखिक आरोग्याची 25 व मोतीबिंदे 55 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 50 रुग्णांत दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. सी.घोडके, डॉ. ए. आय. शेख, एनसीडी अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

0000000

Thursday, October 27, 2016

मुंबईकडे यकृत पाठविण्यासाठी नांदेडमध्ये ग्रीन कॅारिडॅार 
महिन्यात दुसऱ्यांदा अवयवदान, ग्रीन कॅारिडॅारसाठी नांदेडचे योगदान
नांदेड, दि. 27 :- अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॅारिडॅार म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा नांदेड यशस्वी झाले आहे. दात्याचे यकृत नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावरून मुंबईकडे, तर मुत्रपिंड औरंगाबादकडे पाठविण्यात आले. नांदेडने अवयव प्रत्यारोपणासाठी दात्याचे अवयव  यशस्वीपणे रवाना करण्यात दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. यातील अवयवदाता हे कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उद्धव मोरे हे आहेत. त्यांच्या अवयवामुळे काही गरजुंचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे आयुष्य सावरले जाणार आहे. मोरे कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने दिलेल्या संमतीमुळे डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा प्रशासनाने ते पाठविण्यासाठी समन्वयाने प्रयत्न केले.  
अवयवदान आणि अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस यंत्रणा, महानगरपालिका, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडीत व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतीमान केले. ग्रीन कॉरिडॉरमुळे विष्णुपरी ते विमानतळ हे अंतर अवघ्या 11 मिनिटात पार करण्यात आले. यापुर्वीच्या ग्रीन कॅारिडॅारच्यावेळी हे अंतर पार करण्यासाठी 13 मिनीटाचा कालावधी लागला होता. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व महापालिकेच्या समन्वयामुळे तसेच जनतेच्या सहकार्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण न होता 2 मिनीटाचा कालावधी कमी झाला.   
कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उद्धव मोरे (वय 26) हा नायगाव येथून गोपाळचावडी येथे जात असतांना मारताळा जवळ रस्त्यावर अपघात झाला. उपचारासाठी नांदेड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर उपचारासाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मोरे यांची प्रकृती नाजूक होती, मेंदु मृत झाला होता. यश मिळत नसल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर मोरे यांच्या अवयवदान करण्याचे प्रयत्न सुरु केले.  अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना अवदानाचे महत्व पटवून दिले. संतोष यांच्या पत्नी भाग्यश्री मोरे यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर अनुषंगीक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर यकृत घेऊन जाण्यासाठी मुंबईतील ग्लोबल हॉस्पीटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबळ तर मुत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत दरक व डॉ. भुषण डोडीया आणि धुत हॉस्पीटलचे डॉ. सोमवंची नांदेड येथे दाखल झाले. नेत्र नांदेड येथेच प्रत्यारोपण करण्यात येणार आहेत.  
डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, डॅा. पी. टी. जमदाडे, डॉ. आर. जी. पाठक, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. अनिल देवगावकर, डॉ. मंदार टिळक, डॉ. बोडखे यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयाकडून अवयव पाठविण्यासाठीच्या शस्त्रक्रियासाठी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली. आज सकाळी 10.45 मिनिटांनी यकृत घेऊन डॅा. चौबळ आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 11 मिनिटात हा ताफा विमानतळावर पोहचला आणि यकृत घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. यानंतर मुत्रपिंड  घेऊन औरंगाबादचे पथक मोटारीने रवाना झाले. 
ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास नारनवर, पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पांडे, नांदेड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन. डी. रोडे  यांनी प्रयत्न केले. तसेच मोरे यांच्या उपचारासाठी डॉ. ऋतुराज जाधव, डॉ. प्रमोद धोंडे, व डॉ. राजेश अग्रवाल यांनीही प्रथम प्रयत्न केले. 
विष्णुपुरी ते  विमानतळ हा 40-45 मिनिटाचा कालावधी लागणारा प्रवास 11 मिनिटात पार करता आला. हे जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणांना, महानगरपालिका यांच्या प्रयत्नामुळे  रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. जनतेनेही उत्सर्फुतपणे  सहकार्य केले व कमी कालावधीत अंतर पार करणे शक्य झाले. त्यामुळे याबद्दल अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी सर्वांचे विमानतळावर आभार मानले. 
भाग्यश्री मोरे या 9 महिन्याच्या गर्भवती होत्या. आज संतोष मोरे यांचे अवयव काढण्याच्या अगोदर सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पत्नी भाग्यश्री यांनी मुलला जन्म दिला. हे कन्यारत्न जणू अवयव प्रत्यारोपित होणाऱ्यासाठी संजीवनीच्या स्वरुपात मोरे कुटुंबियांत प्राप्त झाले आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.  
0000000

Wednesday, October 26, 2016

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 26  :- जिल्ह्यात मंगळवार 8 नोव्हेंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 25 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर  2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.                        
     00000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून शनिवार 26 नोव्हेंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

000000
नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी
आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नांदेड, दि. 26 :-  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

0000000
तीन दिवस दिवाळी पहाट महोत्सव 2016
बंदाघाट येथे होणार - जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
 नांदेड दि. 26 :- शहरात शनिवार 29, रविवार 30, सोमवार 31 आक्टोंबर 2016 रोजी दररोज सकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत तीन दिवस दिवाळी पहाट महोत्सव-2016 बंदाघाट येथे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणार आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 5.30 वा. पं. कुमार गंधर्व यांचे नातू व प्रख्यात गायक भुवनेश कोमकळी (देवास म.प्र.) आणि श्रीमती हेमा उपासनी (मुंबई) यांचा निर्गुणी भजन, सुफी, मराठी गझल, संत मीराबाई व संत कबिराच्या रचनांवर कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन गोविंद पुराणीक हे करणार आहेत. याच दिवशी सकाळी 8.30 वा. कविता शिरपूरकर (संपर्क क्र.9420668508) या मुली आणि महिलांकरीता रांगोळी स्पर्धा घेणार आहेत.
रविवार 30 ऑक्टोबर 2016 सकाळी 5.30 वा. स्वयंवर प्रतिष्ठान ``रंग अभिषेकी`` प्रख्यात गायक आणि संगीत दिग्दर्शक पं.जितेंद्र अभिषेकी रचित बंदीश, ठुमरी, नाटयपद, अभंग मुंबईच्या प्रख्यात गायक डॉ. राजा काळे यांची कन्या सुप्रसिद्ध गायिका अमृता काळे व पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अभिजीत अपस्तंब हे दोघे सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. सुनील नेरलकर करणार आहेत.
सोमवार 31 आक्टोंबर सकाळी 5.30 वा. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप.सोसायटी लि.नांदेड यांच्यावतीने  पत्रकार विजय जोशी निर्मित व संगीतकार प्रमोद देशपांडे यांच्या संगीत संयोजनाखाली प्रभाती सुर नभी रंगती हा स्थानिक कलावंताचा भक्ती गीत व भाव गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. गजानन पिंपरखेडे हे करणार आहेत. यात कु. वर्धिनी जोशी, शर्वरी हिरवे, तेजश्री देशपांडे, कल्याणी जोशी, समिक्षा चंद्रमोरे व इतर गुणी कलावंत सहभागी होणार आहेत.
व्यासपीठ, बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण व्यवस्था, महानगरपालिका व गुरुद्वारा बोर्ड करणार असून रोज सकाळी `दिवाळी नाष्टा` लंगर साहिब गुरुद्वारा करणार आहे. यासोबत इन्टॅच तर्फे नांदेडचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारे फोटो प्रदर्शन व माँ गोदावरी श्रमसेवा परिवाराच्या कार्याचे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.
प्रत्यक्ष बंदाघाट येथे कार्यक्रमास हजर राहून दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देवून दिवाळी उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनामधील सर्व संस्था कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्या तरी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त रत्नाकर वाघमारे संयोजक म्हणून काम पाहणार आहेत.

---000---
अल्पसंख्याक विकास विभागाचे
प्रधान सचिव श्याम तागडे यांचा दौरा
             नांदेड दि. 26 :-  राज्य अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 28 ऑक्टोंबर 2016 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अल्पसंख्याक विकास विषयी आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत नांदेड येथील वक्फ बोर्डाच्या मालमत्ताची पाहणी करतील. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम. शनिवार 29 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी नांदेड येथून परभणीकडे प्रयाण करतील.

0000000
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौंडीचे सोमवारी आयोजन
             नांदेड दि. 26 :-  सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित केली आहे. सोमवार 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महत्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार असून जुना मोंढा टावर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचित केले आहे.

0000000
दक्षता जनजागृती सप्ताहास सोमवारपासू प्रारंभ
             नांदेड दि. 26 :- भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी प्रशासन याकरीता राज्य शासनाच्यावतीने सोमवार 31 ऑक्टोंबर ते  शनिवार 5 नोव्हेंबर 2016 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
            याअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

000000

Tuesday, October 25, 2016

नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी
जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी जाहीर
नांदेड, दि. 25 :-  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात 472 मतदार आहेत. निवडणुकीतील मतदानासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी उपविभाग निहाय सुनिश्चित करण्यात आली आहे. स्थानिक प्राधिकरण निहाय तसेच तालुका निहाय मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ही संबंधीत मतदान केंद्र पुढील प्रमाणे आहेत. या मतदान केंद्रांची जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाची नावे सोबत देण्यात आली आहेत.
मतदान केंद्राचे ठिकाण- तहसिल कार्यालय नांदेड, या केंद्राशी जोडण्यात आलेली स्थानिक प्राधिकरणाची नावे- जिल्हा परिषद नांदेडसह सर्व पंचायत समिती सभापती, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नगरपंचायत अर्धापूर. तहसिल कार्यालय किनवट - नगरपंचायत माहूर व नगरपरिषद किनवट. तहसिल कार्यालय हदगाव - नगरपंचायत हिमायतनगर, नगरपरिषद हदगाव. तहसिल कार्यालय भोकर - नगरपरिषद भोकर, नगरपरिषद मुदखेड. तहसिल कार्यालय कंधार - नगरपरिषद लोहा व नगरपरिषद कंधार. तहसिल कार्यालय धर्माबाद - नगरपरिषद उमरी, नगरपरिषद धर्माबाद. तहसिल कार्यालय बिलोली- नगरपंचायत नायगाव, नगरपरिषद कुंडलवाडी आणि नगरपरिषद बिलोली. तहसिल कार्यालय देगलूर - नगरपषिद देगलूर व नगपरिषद मुखेड. संबंधितांनी या मतदान केंद्रांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे.

000000

Monday, October 24, 2016


प्र.संचालक, राधाकृष्ण मुळी यांना निरोप तर
 नवीन प्र. संचालक यशवंत भंडारे यांचे स्वागत
       औरंगाबाद, दि. 1: माहिती जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय माहिती कार्यालयातील प्र. संचालक (माहिती) श्री. राधाकृष्ण मुळी यांची बदली  अमरावती तसेच संचालक नागपूर येथे झाल्यामुळे  यांना निरोप देण्यात आला, तर नवीन प्र.संचालक यशवंत भंडारे यांचे स्वागत आज  संचालक (माहिती), कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.
 या वेळी संचालक (माहिती), राधाकृष्ण मुळी यांना  शाल, पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी संचालक (माहिती) श्री मुळी आपल्या मनोगतात म्हणाले माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळात सर्व आधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने ही वाटचाल यशस्वी   करता आली. तसेच नवीन संचालक माहिती श्री. यशंवत भंडारे यांना येत्या वाटचालीसाठी शुभेच्छा ही  दिल्या.
            यावेळी नवीन प्र.संचालक यशवंत भंडारे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, कुठलेही शासकीय काम कोण्या एका व्यक्तीचे नसून सांघिक प्रयत्नातून यशस्वी होत असते. कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी श्री. रा.वि.देठे , सहायक संचालक डॉ.रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी, वंदना थोरात, तसेच कर्मचाऱ्यामध्ये विलास सरोदे, यशंवत सोनकांबळे, ..पठाण यांनी मनोगत व्यक्त केले त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक माहिती कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद येथील सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती सहायक श्रीमती संजीवनी जाधव(पाटील) यांनी केले तर माहिती सहायक शाम टरके यांनी सर्वांचे आभार मानले.
        
    श्री. यशंवत भंडारे यांनी यापूर्वी पुणे येथे उपसंचालक(माहिती) या पदासह जिल्हा माहिती अधिकारी म्हणून औरंगाबाद , लातूर ,जालना येथे तर सहायक संचालक म्हणनू मंत्रालय , मुंबई , औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय माहिती कार्याल्यात काम केले आहे. तसेच माहिती जनसंपर्क महासंचालनाल्यात येण्या पूर्वी श्री. भंडारे यांनी उपसंपादक म्हणून दै. लोकमत, (औरंगाबाद), दै. सकाळ, (पुणे/नशिक) वृत्तसंपादक म्हणून दै. विश्वमित्र (औरंगाबाद), दै. एकमत मध्ये काम केले आहे. धुळे वृत्तपत्र विद्या आणि संज्ञापन विभागात विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी  पाच वर्षे काम  केले  आहे. त्यांना राज्य शासनाने यशंवतराव चव्हाण विकास वार्ता पुरस्कार देऊन पुरस्कृत केले आहे. त्यांचे काही ग्रंथही प्रकाशित झाली आहेत. आज त्यांनी लातूर येथील उपसंचालक पदाचाही कार्यभार स्वीकारला आहे.
-*-*-*-*-*-*


नांदेडमध्ये ई-पीडीएसद्वारे ऑनलाईन
शिधापत्रिका वाटपास सुरुवात
राज्यातील पहिलाच प्रयोग, जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन
 
नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यातील ई-पीडीएस प्रणालीद्वारे शिधापत्रिका वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. ई-पीडीएएस सिस्टीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते आज तहसिल कार्यालय नांदेड येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहलिसदार पी. के. ठाकुर यांची उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी ईपीडीएस सिस्टीम ही नागरिकांच्या उपयोगी आहे. नागरिकांना घरी बसून ऑनलाईन शिधापत्रिकेचे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर त्यांना स्मार्ट कार्ड सारखे राशन कार्ड मिळणार आहे. अशा प्रकारच्या प्रणालीची राज्यात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली आहे. ही माहिती food chain management system साठी सुद्धा वापरण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा वापर सुरु झाल्यानंतर सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना फळे, भाजीपाला, आटा, खाद्यतेल, 11 प्रकारचे तांदूळ, कडधान्य, गुळ, शेंगदाने, रवा, मैदा, चणापीठ अशा विविध गोष्टींची विक्रीची परवानगी देण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या अद्ययावत प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे.
प्रस्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर म्हणाले की, या प्रणालीमुळे ऑनलाईन चलन, ऑनलाईन परमिट, ऑनलाईन वितरण होण्याची सुविधा प्राप्त होवून या प्रक्रियेमध्ये विलंब कमी होवून वेळेवर धान्य उचलण्याची सुविधा रास्त भाव दुकानदार यांना उपलब्ध होणार आहे. नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी आभार मानले.

000000
रब्बी हंगामासाठी बी-बियाणे उपलब्धतेबाबत
काटेकोर नियोजन व्हावे- जिल्हाधिकारी काकाणी
हंगामातील पीक क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करण्याचेही निर्देश
नांदेड, दि. 24 :- आगामी रब्बी हंगामासाठी प्रामुख्याने हरभरा, भुईमूग आणि ज्वारी या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न व्हावेत. रब्बा हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी आवश्यक अशा बियाण्याच्या उपलब्धतेबाबत कृषि विभागाने काटेकोर नियोजन करण्यात यावे. बी-बियाण्यांच्याबाबत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांच्या पुरेश्या उपलब्धतेबाबत वेळीच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगामाच्या नियोजनांसाठी कृषि विभाग आणि बी-बियाणे पुरवठादारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीत बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, अनुदानित बियाण्याची उपलब्धता आणि खुल्या बाजारातील बियाणे याबाबतही मार्गदर्शन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, मोहिम अधिकारी ए. जी. हांडे, तंत्र अधिकारी एस. बी. शितोळे, बी-बियाणे खत विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, महाबीजचे व्यवस्थापक के. एल. सावंत तसेच राष्ट्रीय बिज निगम, कृभको यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
रब्बी हंगामात हरभरा, भुईमूग आणि ज्वारी यांच्या क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. हरभरा  बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अनुदानित आणि खुल्या बाजारातील विक्री याबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्धतेबाबत महाबीज, कृषि विभाग, घाऊक विक्रेते आणि तालुकास्तरावरील यंत्रणांनी संपर्क-समन्वय ठेवावा. जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी माहितीची देवाण-घेवाण करावी, असेही त्यांनी सांगितले. खतांचा पुरवठा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतही यावेळी चर्चा झाली.
हरभऱ्याचे अनुदानित बियाण्याचे वाटपात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर आणि सात-बारा, आधार कार्डच्या नोंदी घेऊन प्रति शेतकरी तीस किलोचे वाटप करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या अनुदानित बियाण्याचा दर ऐंशी रुपये प्रतिकिलो असा आहे. तर खुल्या बाजारातील विक्रीबाबत शेतकऱ्यांनी संबंधित छापील किंमतीची खात्री करून बियाणे घ्यावे. बियाणे खरेदीची पावती घ्यावी व ती जपून ठेवावी. बी-बियाणे व खतांच्या दुकानात कृषि तसेच विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी आल्यास संबंधितांकडे किंवा तालूका कृषि अधिकारी, पंचायत समितीच्या कृषि अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागाच्यावतीने बैठकी दरम्यान करण्यात आले.
जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रात अडीच लाख हेक्टरपर्यंत वाढ व्हावी, त्यातही पिक-पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात यावे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...