वृत्त क्रमांक 1091
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
विकसित भारत चॅलेंज ट्रॅक अंतर्गत युवकांना नवे व्यासपीठ- जिल्हा क्रीडा अधिकारी
नांदेड, दि. 14 ऑक्टोबर : युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन करणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने युवक कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक व युवतींनी आपली नावे, प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात.अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आवाहन केले आहे.
सन 2025-26 साठीचा राष्ट्रीय युवा महोत्सव “विकसित भारत युवा नेतृत्व विकास (VBYLD-2026)” हा कार्यक्रम 10 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरावर युवा महोत्सव सांस्कृतिक व नवोपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हास्तरीय महोत्सवात पुढील सांस्कृतिक व कौशल्यविकास स्पर्धांचा समावेश आहे :
सांस्कृतिक कला प्रकार-लोकनृत्य (10 सहभाग), लोकगीत (10 सहभाग), कौशल्य विकास:-कथालेखन (3 सहभाग),चित्रकला (2 सहभाग), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी/हिंदी - 2 सहभाग),कविता (500 शब्द मर्यादा - 3 सहभाग) एकूण सहभाग संख्या 30 असून, वयोगट 15 ते 29 वर्षे राहील. सहभागी युवकांनी जन्मतारखेचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
नवोपक्रम ट्रॅक (Cultural and Innovation Track विज्ञान प्रदर्शन)
या उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये व तांत्रिक संस्थांतील विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम विषयांवरील प्रकल्प प्रदर्शित करतील.
किमान 10 पथकांचा सहभाग (प्रत्येक पथकात 5 सदस्य) अपेक्षित असून, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य तंत्रज्ञान, डिजिटल उपाययोजना आदी विषयांचा समावेश असेल. जिल्हास्तरीय स्पर्धेतून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पथक विभागीय स्तरावर पात्र ठरतील.
विकसित भारत चॅलेंज ट्रॅक
या चॅलेंजचा उद्देश युवकांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. ज्यामध्ये ते कृषी, कौशल्य विकास, शासकीय व्यवस्था, अवकाश तंत्रज्ञान, सामाजिक परिवर्तन, महिला सक्षमीकरण व आत्मनिर्भर भारत या क्षेत्रांवरील नवोन्मेषी कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
या अंतर्गत युवकांच्या निवडीचे चार टप्पे असतील :
ऑनलाईन प्रश्नमंजुषा (1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025), निबंध स्पर्धा (23 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025),राज्यस्तरीय PPT सादरीकरण (24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2025),राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरण – नवी दिल्ली (10 ते 12 जानेवारी 2026) होणार आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment