वृत्त क्रमांक 622
स्वच्छता तेथे आरोग्याची धनसंपदा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर नांदेड, दि. 16 जून :- स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृध्दी असा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिला आहे. जिथे स्वच्छता असते तिथे सुख-शांती असते. ज्या घरात स्वच्छता असते तेथे आरोग्याची धनसंपदा असते. म्हणून स्वच्छतेला महत्त्व असून ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. आज राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर ह्या माहूर येथे दर्शनाच्या व आनंद दत्तधाम आश्रमभेटीच्या निमित्ताने नियोजित दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रथम माहूर गडावरील भगवान दत्त प्रभू, माता रेणुकेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंद दत्तधाम आश्रमास भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आश्रमाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी भक्तांना संबोधित करताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुघलांनी उध्वस्त केलेल्या मंदिराची उभारणी करण्याचे काम 300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केले. त्यांच्याच विचाराचा वारसा पुढे नेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्राचे मंदिर अयोध्येत उभा केले. काशी कॉरिडॉर उभारले, उज्जैन मंदिराचा विकास केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ही तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून भरभरून निधीची घोषणा केली आहे. त्यात श्रीक्षेत्र माहुरचा देखील समावेश आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्र दर्जेदार व्हायला पाहिजे त्या ठिकाणावरून आपणास ऊर्जा मिळते त्यासाठी आमचे राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. साईनाथ महाराज वसमतकर यांनी माहूर या संत भूमीचे महत्व सांगून राज्य सरकारचा स्वच्छता दूत म्हणून शेवट पर्यंत देशसेवा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपचे तालुकाध्यक्ष निळखंट मस्के, संध्या प्रफुल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी तर आभार भाऊ पाटील यांनी मानले. 00000
No comments:
Post a Comment