Saturday, March 8, 2025

वृत्त क्रमांक 270

मानसिकता बदलविण्यासाठी

महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

 •  बालिका पंचायत 2.0 चा जिल्ह्यात शानदार शुभारंभ 

नांदेड दि. 8 मार्च :- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे. या उपक्रमाला सुरूवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचे स्वागत केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अनेक गावांचा आम्ही समावेश केला असून या माध्यमातून महिला सबळीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी महिलांच्या या उपक्रमाला घराघरातील महिलांचा पाठिंबा वाढणे आवश्यक असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.  

जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व स्वच्छता विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.  

याप्रसंगी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची मंचावर उपस्थित होती.  

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बालिका पंचायत उपक्रमाच्या दुसऱ्या टप्पाचा शुभारंभ करण्यात आला. यात नव्याने 211 गावांमधून बालिका पंचायत उपक्रम राबवला जाणार आहे. 

यापूर्वी जिल्हा परिषदेने या उपक्रमामार्फत गावागावात स्वच्छता मोहीम, दारूबंदी, वृक्षारोपन, शाळांचे बळकटीकरण, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, ग्रामपंचायत प्रशासनात मदत अशा अनेक उपक्रमांना राबविले आहे. आज बालिका पंचायत 1.0 मध्ये काम केलेल्या मुलींनी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तसेच याठिकाणी अनेक गावांचे सरपंच या उपक्रमात सहभागी, गावातील शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष म्हणजे महिला सरपंचही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

काय आहे बालिका पंचायत

केंद्र शासनाने महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापूर्वीच महिलांना आरक्षण आहे. मात्र हे प्रतिनिधित्व करत असतांना महिलांमध्ये आपल्या पंचायतराज समितीच्या कारभाराची माहिती असावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते संसद सभागृहापर्यंत महिला प्रतिनिधित्व व त्याचे दायित्व याबद्दलची माहिती मिळावी. गावातील प्रशासन व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढावा. त्यांच्या नेतृत्व गुणात वाढ व्हावी, महिला नेतृत्वाला पुढाकार मिळावा यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. सिईओ मिनल करनवाल यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून नांदेड जिल्ह्यात त्याला गेल्यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

00000










No comments:

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आनंद पाटील बोंढारकर यांनी यावेळी भाविकांना शुभेच्छ...