Friday, January 3, 2025

  वृत्त क्रमांक 17

ऑनलाइन सेवा आणखी लोकाभिमुख करा : दिलीप शिंदे 

 राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्तांकडून जिल्हयाचा आढावा

नांदेड दि. 3 जानेवारी : पारदर्शिता ठेवतानाच अगदी वेळेत नागरिकांना माहिती देण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करा. जिल्ह्यामध्ये प्रत्येक सेवा ऑनलाईन होईल याकडे कटाक्ष ठेवा ऑनलाईन सेवा आणखीन लोकाभिमुख करा असे आवाहन राज्यसेवा हक्क आयोगाचे आयुक्त निवृत्त सनदी अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे केले.

नांदेड जिल्ह्यातील राज्यसेवा हक्क आयोग अंतर्गत येणाऱ्या सेवांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांकडून जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील सेवांसंदर्भात आढावा घेतला.

आयोगाने सेवांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाव्यात. याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही यंत्रणा अधिक गतिशील करावी, असे आवाहन त्यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात गेल्यावर्षी प्रलंबित प्रकरणांची टक्केवारी 25% पर्यंत गेली होती. मात्र ती आता दोन टक्क्यांवर आली आहे. तसेच अर्ज प्राप्त होण्याची संख्याही सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात पाच लाख अर्ज प्राप्त झाले होते. आता नऊ महिन्यांमध्येच पाच लाख तीन हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या कामगिरीकडे सकारात्मकतेने बघताना त्यांनी सेवा आणखीन लोकाभिमुख कशा होतील याकडेही कल्पकतेने लक्ष देण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी अन्नधान्य व पुरवठा, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, गृह विभाग, घरे निर्मिती, उद्योग विभाग, कामगार विभाग, कायदा व सुव्यवस्था विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास, शालेय शिक्षण व क्रीडा,समाज कल्याण,उत्पादन शुल्क विभाग, वाहतूक, आदिवासी विकास, स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंधारण, महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतला.

वय ,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र ,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ,अयपतीचा दाखला अशा तातडीच्या दाखल्यासंदर्भात आणखी तत्परता दाखवून वेळेच्या आत तातडीने नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. 

सेतू केंद्राचा वापर जिल्ह्यात वाढला आहे. तो सर्वत्रच वाढत आहे. मात्र ज्या ठिकाणी सेतू केंद्र सुरू झाले नसतील ते तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.जिल्ह्यात सद्यस्थितीत 1575 सेतू केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यापैकी जिल्ह्यामध्ये 14O4 सेतू केंद्र कार्यान्वित आहे. शहरी भागात 265 सेतू केंद्र कार्यान्वित आहे. 171 ठिकाणी आणखी सेतू केंद्र उभारण्याचे काम बाकी असून हे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

00000










No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 24 दर्पण दिनानिमित्त आज जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान  नियोजन भवनमध्ये ४ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम  नांदेड दि. 5 जानेवारी : ...