वृत्त क्रमांक 14
निराधार लाभार्थ्यांना मिळणार आता थेट बँक खात्यात अनुदान
नांदेड दि. 3 जानेवारी :- संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा माध्यमातून लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत केली जात आहे. यासाठी आधार प्रमाणिकरण अत्यावश्यक असून दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
तसेच सप्टेंबर 2023 पासून प्रलंबित असलेले कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे अनुदान ज्यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास 20 हजार एकरकमी वारसांना देण्यात येतात. अशा 400 लाभार्थ्याचे एकूण 80 लक्ष रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील केंद्र शासनाचे अनुदान देखील जिल्ह्याला प्राप्त झाल्याची माहिती संजय गांधी योजना विभागाच्या तहसिलदार प्रगती चोंडेकर यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment