विशेष वृत्त क्र. 730
केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा भोकर येथून थाटात शुभारंभ
नांदेड (भोकर), दि. 17 ऑगस्ट : केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहे, प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछेडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपल्या परंपरागत बंजारा पेहराव मध्ये आलेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात महिलांनी राज्य शासनाच्या या योजनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारने महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना सुरू केल्या आहे. केंद्रात आलेल्या शासनाने दहा वर्षापूर्वी घरातील महिलांना स्वयंपाकाच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी उज्वला गॅस योजना सुरू केली. केंद्र सरकारने 20 कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. आम्ही राज्य सरकारने आणखी त्यामध्ये भर घातली असून आता महिलांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.महिलांना एसटी भाडे 50% माफ करण्यात आले आहे. राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. बचत गटाच्या बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देण्यात येत असून सोळा हजार कोटींचा पतपुरवठा करण्यात आला आहे. हक्काचे घर, प्रत्येकाला घर,प्रत्येक घरात शौचालय आणि आता प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.
यावेळी उपस्थित महिलांना संबोधतांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नसतील त्यांनाही ते मिळतील याबद्दल आश्वस्त केले.31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी असेल. त्यामुळे या संदर्भात कोणी काही गैरसमज पसरवत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन केले.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा,बचत गट स्थापन करावेत असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशी उपस्थित महिला समुदायाला विचारणा केली. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्या सर्व महिलांना अर्ज करायला सांगा असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी संबोधित केले. केंद्र व राज्य शासन महिलांसाठी नवनवीन योजना आणत असून त्या सर्व योजनांचा वापर भोकर पासून तर नांदेड पर्यंत सर्वांना मिळेल याची खात्री बाळगा. आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अजित गोपछडे श्रीजया चव्हाण यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले.
000
No comments:
Post a Comment