वृत्त क्र. 713
#फवारणी करताना विषबाधा झाल्यावर काय करायचे ?
गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे ?
ऑन द फिल्ड कार्यशाळेचे फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण
#नांदेड दि. 13 ऑगस्ट :- कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रण कसे करावे यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्ह वरून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गुलाबी बोंडअळीची जीवन साखळी तोडल्याशिवाय त्यावर पुर्णत: नियंत्रण मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषि विभाग तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी शिफारस केलेल्या औषधाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. नांदुसा येथे संजय कोंडीबा जनकवाडे यांच्या शेतात किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली.
हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या कृषि विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हा कार्यक्रम घरी बसून पाहता आला.
याकार्यक्रमात किटकनाशके खरेदी करण्यापासून त्याचे मिश्रण तयार करणे, प्रत्यक्ष शेतावर फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. किटकनाशकाचे धोके तसेच विषबाधा झाल्यास प्रथमोपचार काय करावेत याबाबत कृषी विद्यापिठ परभणीचे अंतर्गत कापूस संशोधन केंद्राचे अरविंद पांडागळे यांनी माहिती दिली. तसेच शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी कापूस पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मीक किड नियंत्रण तसेच रासायनिक किटकनाशक वापरुन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. त्यानंतर पोखर्णी येथील शास्त्रज्ञ देविकांत देशमुख यांनी सुध्दा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना फवारणी करताना वापरावयाच्या सेफ्टी किटचे तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅपचे वाटप करण्यात आहे.
किटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत कृषी विभागामार्फत जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणाऱ्या मोबाईल डिजीटल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी धानुका कंपनीमार्फत सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी श्री. कळसाईत, मोहिम अधिकारी सचिन कपाळे, गट विकास अधिकारी पी.के.नारवटकर, तालुका कृषि अधिकारी सिध्दार्थ मोकले, नांदुसा गावच्या सरपंच श्रीमती पुजा जनकवाडे, पोलीस पाटील गजानन जनकवाडे तसेच गावातील शेतकरी, नागरिक, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि सहायक जारीकोटे यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील लक्ष्मण जनकवाडे यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment