Tuesday, July 23, 2024

वृत्त क्र. 625

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्यांची मुदत 

 नांदेड दि. २३ जुलै:- अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यासह विविध ठिकाणी यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

राज्यात 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम  (एसईबीसी) 2024 एकमताने संमत करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आणि शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आले. याचा लाभ प्रामुख्याने मराठा समाजाला झाला आहे.

एसईबीसी अधिनियमाचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन प्रमाणपत्र सादर करण्यास वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याच्या सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला आहे.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 1060 राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 7 ते 9 नोव्हेंबर ...