वृत्त क्र. 624
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी
ग्रामीण भागातून पावणेदोन लाख अर्ज दाखल
· अर्ज भरुन घेण्यासाठी गावा-गावात कॅम्पचे आयोजन
· जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थीनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 23 जुलै : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 लाख 75 हजार 661 महिलांनी आपले अर्ज दाखल केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शिबिर लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना अर्ज भरण्याची संधी मिळणार असून यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रत्येक गावा-गावात कॅम्पचे आयोजन आले आहे. जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 31 ऑगस्ट अखेरची तारीख असली तरी अखेरच्या तारखेची वाट न पाहता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज उमरी तालुक्यातील दुर्गानगर तांडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी अंगणवाडीस भेट दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिला व ग्रामस्थांना त्यांनी माहिती दिली. तसेच या योजनेत जास्तीत जास्त पात्र महीला लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांचे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने अर्ज स्विकारले जात आहेत. तसेच महिलांनी अर्ज भरताना आधारकार्ड नुसार माहिती भरावी. तसेच नारीशक्तीदूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच अर्जात लिहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात कालपर्यत ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही मिळून तालुकानिहाय प्राप्त अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अर्धापूर 12 हजार 948, भोकर 7 हजार 254, बिलोली 14 हजार 83, देगलूर 12 हजार 600, धर्माबाद 5 हजार 664, हदगाव 11 हजार 742, हिमायतनगर 5 हजार 208, कंधार 13 हजार 418, किनवट 13 हजार 244, लोहा 10 हजार 29, माहूर 15 हजार 422, मुदखेड 10 हजार 550, मुखेड 17 हजार 897,नायगांव 10 हजार 857, नांदेड 9 हजार 157, उमरी 5 हजार 588 याप्रमाणे आहे. यात ऑफलाईन 1 लाख 10 हजार 449 तर ऑनलाईन 65 हजार 112 प्राप्त अर्जाची संख्या आहे.
00000
No comments:
Post a Comment