वृत्त क्र. 559
कृषि विभागाचे विविध कृषि पुरस्कार
· कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले
शेतकरी, व्यक्ती, गट, संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 जुलै :- राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षांमध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गटांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. या विविध कृषि पुरस्काराचे प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment