Friday, July 5, 2024

  ( कृपया सोबतच्या वृत्तास वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी ही विनंती.)

वृत्त क्र. 562

महिलांनो ! “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” 
योजनेसाठी “नारी शक्ती दूत ॲप” डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा ; सोमवारपासून गावांमध्ये शिबीर
     
नांदेड, दि. 5 जुलै :- राज्य शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्जामुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांना मदत करण्यासाठी सोमवारपासून गावागावात शिबीर सुरू होतील. यामध्ये मागेपुढे होऊ शकते. मात्र त्यासाठी गोंधळ, गडबड करू नये. प्रशासनाकडून सर्व पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी तसेच यासंदर्भातील सर्व यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. अंगणवाडी सेविकेजवळ, नगरपालिकेमध्ये शहरासाठी प्रभाग कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध आहेत. मात्र हे सर्व अर्ज ऑनलाईनच भरावे लागणार आहेत. या ऑनलाईन अर्ज भरण्याचा तणाव कोणी घेऊ नये. प्रत्येकांचा अर्ज भरणे शासनाची जबाबदारी आहे. सोमवारपासून गावांमध्ये या प्रक्रियेला सुरूवात होईल. गावातील सुशिक्षित तरुणांनी सरपंचापासुन तर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी, महाविद्यालयीन तरुणांनी हा ॲप डाऊनलोड करण्यासाठी, अर्ज अपलोड करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

अर्ज ऑनलाईनच का ?
या योजनेतील अर्ज भरतांना अन्य कागदपत्रांसोबतच छायाचित्र काढणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे हा अर्ज ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे. साधा अर्ज, ऑफलाइन अर्ज भरला तरी संबंधित कर्मचाऱ्यांना अर्जदाला बोलवून त्याचा समक्ष फोटो काढावा लागणार आहे. त्यामुळे शक्य झाल्यास गावातील तरुणांनी या ॲपवर अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या भगिंनींना मदत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

अधिकृत अर्ज कोणता ?
ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे तरीही अनेकजण ऑफलाईन अर्ज भरत आहेत. हा अर्ज भरतांना ज्या अर्जांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावलेले आहेत तो अर्ज अधिकृत आहे. काही ठिकाणी अनधिकृत अर्ज पुढे येऊ शकतात. चुकीची माहिती भरली जाऊ शकते. त्यामुळे अधिकृत अर्ज भरण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज करू नये
शासनामार्फत महिलेला दरमहिन्याला दीड हजार रूपये बँक खात्यामध्ये थेट दिले जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये देखील दीड हजार रूपये महिना दिला जातो. त्यामुळे ज्या महिला या योजनेतून यापूर्वीच ही रक्कम मिळवत आहेत त्यांचा अर्ज रद्द होईल. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मुदत 31 ऑगस्ट पर्यंत
या योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मी मागे राहिली, मला लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची भिती कोणत्याही महिलेने मनात आणू नये. गोंधळ करू नये. सर्वांना जुलै महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. ऑगस्टमध्ये देखील अर्ज दाखल झाला तरीही जुलै महिन्यापासून लाभ मिळणार आहे. ऑनलाईन असल्यामुळे कोणताही अर्ज परिपूर्ण व अटी व शर्ती पूर्ण असल्याशिवाय अपलोड होणार नाही. कोणत्याही एजंटची मदत घ्यायची गरज नाही. गोंधळ, गडबड करण्याची गरज नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0000

1 comment:

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...