वृत्त क्र. 132
इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षेत
गैर प्रकार केल्यास गय केली जाणार नाही
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 15 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी, 12 वीच्या सन 2024 परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असून सर्व केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. या परीक्षा सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सकारात्मकतेने काम करावे. या परीक्षेत गैरप्रकार केल्यास कोणतीही गय केली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक परीक्षा इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, परीक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदीची उपस्थिती होती. उत्तीर्ण होण्यासाठी गैरप्रकार अथवा कॉपी करणे हा पर्याय नाही. यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी एकत्रित सामंजस्याने विचार करुन अभ्यासाला द्यावे. उत्तीर्ण होण्यासाठी जास्त मेहनतीची आवश्यकता नसून, प्रॅक्टीकलचे गुण सोडले तर केवळ 15 गुणांची आवश्यकता उत्तीर्ण होण्यासाठी आहे. यासाठी अभ्यासाचे चांगले नियोजन केल्यास कॉपी करण्याची अथवा गैरप्रकार करण्याची गरज भासणार नाही असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही व अनावश्यक जमाव दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर 100 टक्के बंदी घालावी. कारण सध्याच्या काळात याच कारणाने मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे यावर्षीची परीक्षा ही भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात होईल या दृष्टीने सर्वांनी नियोजन करावे. मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, संस्था प्रतिनिधी यांनी गैरप्रकाराला कोणत्याही प्रकारे समर्थन देवू नये, तसे आढळल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी ज्याठिकाणी अनुचित प्रकार घडले, मोठया प्रमाणावर जमाव होता अशा केंद्रावर आम्ही अधिकची कुमक तैनात करणार आहोत. परीक्षार्थ्यांकडे परीक्षेच्या साहित्या व्यतिरिक्त अनावश्यक साहित्य असल्यास ते त्वरीत जप्त करावे. याबाबत काही अडचण आल्यास त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनशी केंद्रावरील पोलीस कर्मचा-यांच्या मदतीने संपर्क साधावा. पोलीस प्रशासन पुर्णपणे सहकार्य करेल असे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या सांगितले की, यावर्षी पाणी वाटप करण्यासाठी वॉटर बॉय ठेवण्यात येणार नाही, भरारी पथकाच्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात येतील, कॉपीला संपूर्णपणे आळा घालण्याची जबाबदारी ही आपल्या शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कॉपीला व गैरप्रकाराला संपूर्णपणे आळा घातला पाहिजे. मागील वर्षी पुरवणी परीक्षेला लातूर विभागाचा निकाल राज्यात चांगला लागला. परंतु यावर्षी एकाही विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसण्याची आवश्यकता भासणार नाही यासाठी सर्व शिक्षकांनी अध्यापन उत्कृष्ट करण्याचा निर्धार करावा. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास जिल्हा शिक्षण विभाग व मंडळ कार्यालयाचे संपर्कात नेहमी रहावे. यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात घ्यावी असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी केले.
मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष संजय शिप्परकर यांनी सर्वाच्या वतीने यावर्षीची परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणातच होईल याची ग्वाही दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
0000
No comments:
Post a Comment