वृत्त क्र. 892
वंचित व गरजू लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी
विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची
- पालकमंत्री गिरीश महाजन
· मनपा क्षेत्रातील यात्रेच्या चित्ररथाचे पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रत्येक घटकातील व्यक्तींना विकासाची संधी मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. सर्वांचा विकास हे अंतिम ध्येय बाळगुन आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्वला गॅस अशा कितीतरी लोककल्याणकारी योजनांनी सर्वसामान्यांना बळ दिले. आजही विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचितांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा अधिक महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज यात्री निवास परिसर नांदेड येथे करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासन व नांदेड शहर महानगरपालिकेच्यावतीने विकसीत भारत संकल्प यात्रा नांदेड महानगराच्या प्रत्येक भागात पोहचून वंचितांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांची नावे या यात्रेत नोंदविली जाऊन त्यांना लाभ दिले जाणार आहेत. दिनांक 30 डिसेंबर पर्यंत ही यात्रा महानगरपालिकेच्या 13 प्रभागातून जाणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.
या यात्रेत मनपा क्षेत्रात 419 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. 255 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीएम स्वनिधी या योजनेत 10 हजार रुपये कर्जासाठी 266 लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. यावेळी विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
0000
छायाचित्र : पुरुषोत्तम जोशी, नांदेड
No comments:
Post a Comment