दि. 26 डिसेंबर, 2023
बाबा जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या
शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल
- पालकमंत्री गिरीश महाजन
नांदेड, (जिमाका) दि. 26 :- संपुर्ण भारताला शौर्याचा समृद्ध वारसा देणाऱ्या साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या स्मृतीचा आजचा दिवस आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णय या कोवळ्या बालकांवर मुघल शासक वजीर खान याने लादला होता. या बालकांनी मरण यातना सहन केल्या. परंतु धर्म बदलणार नसल्याचे सांगितले. आपल्या शीख धर्माला त्यांनी प्राधान्य दिले. भारतातील सर्वांसाठी ही घटना एक मिसाल बनली आहे. सर्वांसाठी ही प्रेरणा असून हा शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीने येथील गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे अयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवस व सर्व धर्म संमेलनात ते बोलत होते. यावेळी पंचप्यारे साहेब, बाबा बलविंदरसिंग जी, पंजाब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हरभजन सिंघ, खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारता सारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्व धर्माप्रती आदर व श्रद्धा असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. परस्पर धर्मा विषयी संहिष्णुता गरजेची आहे. परस्पर आदराच्या शिकवणुकीला आपल्या संस्कृतीने प्राधान्य दिले आहे. भारताला जी त्यागाची परंपरा लाभलेली आहे त्यातील शौर्य व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याप्रती कायम कृतज्ञता युवकांनी बाळगली पाहिजे. एका समृद्ध पायावर उभा असलेला देश भविष्यात तुम्हा युवकांच्या हाती येणार असून त्यासाठी आजपासूनच अधिक सुसंस्कृत, जबाबदार, कर्तव्य तत्पर आणि निरव्यसनी व्हा, असे भावनिक आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साहिबजादे, बाबा जोरावर सिंग, बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाला अधोरेखीत करून 9 जानेवारी 2022 रोजी आजचा दिवस वीर बाल दिवस दिन म्हणून भारतभर साजरा होईल असे सर्व प्रथम जाहीर केले. या पाठिमागे सर्व मुलांना त्यागाची प्रेरणा मिळावी या उद्देश त्या पाठिमागे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उद्याच्या सशक्त भारतासाठी आयुष्यभर आपण कोणतेही व्यवसने करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ घेण्याचे भावनिक आवाहनही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुलांना केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा वीर बाल दिवस साजरा करतांना संपूर्ण देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा संपूर्ण देशाचा सन्मान आहे, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगून वीर बालकांना नमन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांनी केले.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. निबंध स्पर्धेत पुष्पिंदर कौर परमीत सिंघ संधू, राजेश गोविंद राठोड, अनिता कौर प्रीतम सिंघ कामठेकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार मिळाले. प्रोत्साहनपर बक्षिसे श्वेता गायकवाड, शिवकांत मोकमपल्ले यांना देण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेच्या वरिष्ठ गटात संतोष उत्तरवार, वैभव काळे, गोविंद निमगाडे यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली. मुलींच्या गटात वर्षा खानसोळे, वैष्णवी दहिमल, सामका राठोड तर ज्युनिअर मुलांच्या गटात शिवम इंगळे, श्रीकांत ठाकूर, सोहम चक्रधर, मुलींच्या गटात विणया माचुपुरे, आकांक्षा कदम, वैष्णवी गंगासागर हे अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे असे विजयी ठरले.
00000
छायाचित्र : पुरुषोत्तम जोशी, नांदेड
No comments:
Post a Comment