Sunday, October 15, 2023

 वृत्त

 

शेतरस्ते व पांदण रस्त्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी

तहसिलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी

-         महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील   

                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- कृषिक्षेत्राच्या विकासात लहान-मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक असणारी बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्यांची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, संतुकराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील आपत्तीच्या काळात महसूल विभागाने आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना, सेवा, सुविधा या जनतेपर्यंत जलद पोहचण्यासमवेत त्याचा लाभ देण्यासाठी इतर विभागांशी परस्पर समन्वय हा अधिक महत्त्वाचा असतो. यासाठी राजस्व अभियान, ई-चावडी, मिशन 90 दिवस, सलोखा योजना याची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. देशाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ व्हावी यादृष्टीने मेरी माटी मेरा देश हे अभियान जिल्ह्यातील किमान 1 लाख मुलांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी विभाग प्रमुखांना दिले. तलाठी, तहसिलदार, कृषि अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी समन्वय ठेवून मिशन मोडवर काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतरस्ते, पांदणरस्तेबाबत गती मिळावी यादृष्टीने जलद नियोजन आवश्यक असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणुन दिले. याचबरोबर लालकंधारी ही बैलाची जात कंधारची ओळख आहे. या भागातूनच लालकंधारी सर्वत्र पोहोचले. गौळ येथे शासनाची यासाठी जागा असून हे केंद्र कंधार येथे होण्याबाबत आग्रही मागणी त्यांनी महसूल मंत्री तथा पशु व संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतरस्ते, पांदणरस्ते व शेतीच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले.

00000

 

छायाचित्र : सदानंद वडजे, नांदेड





No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...