डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर 24 रुग्णांचा मृत्यू
· रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध
· रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम तत्पर
· दाखल होतानाच रुग्णांची स्थिती होती चिंताजनक
नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण (5 पुरुष, 7 महिला) व 12 नवजात शिशु रुग्ण होते.
प्रौढ रुग्णामध्ये 4 हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात व इतर आजार याप्रमाणे व बालकांपैकी 4 अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला असून अजून 4 कोटी रुपये मंजूर झाला आहे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.
गेल्या दोन दिवसात अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून व बाहेरून जास्त प्रमाणात आले आहेत. डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेऊन आहेत. अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. दाखल असलेल्या इतर रुग्णांना आवश्यक तो औषधोपचार केला जात आहे असे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरीचे वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली.
00000
No comments:
Post a Comment