Tuesday, October 3, 2023

 वृत्त

 

पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तातडीने भेट देऊन पाहणी

 

·    सुधारणेसाठी काही कमी पडू दिले जाणार नाही

-         पालकमंत्री गिरीश महाजन    

·    वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरले जातील

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  

                                                                                                           

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गंभीर आजारी असलेली बालके दगावल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याची तात्काळ गंभीर दखल घेऊन राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर आजारी रुग्णांची पाहणी करून त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर आढावा बैठक घेऊन निर्देश दिले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीत वरिष्ठ पातळीवर बैठकीत त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, वैद्यकीय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

 

रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिले. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 3 ची सुमारे 130 कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर झाली असून ती 1 महिन्यात नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त राजीव निवतकर यांना मंत्री महोदयांनी दिल्या. वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत तात्काळ भरण्याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याचेही त्यांनी सांगितले. औषधासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयातील अस्वच्छता व अल्प कर्मचारी, व्यवस्थापन याचे समर्थन करता येणार नाही. यात सुधारणा करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या महाविद्यालयातील व रुग्णालयातील दुरावस्था, जिल्ह्यातील रुग्णांची होणारी गैरसोय याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

 

वेळप्रसंगी जिल्हा नियोजन विकास आरखड्यातील काही निधी हा औषध खरेदीसाठी वळविला जावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत केली.

 

आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी बैठकीत विविध सूचना केल्या.

 

दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरच्या कालावधीत एकुण 24 अंतीगंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 ही नवजात शिशू होते. यातील 9 रुग्ण हे खासगी रुग्णालयातून संदर्भीत झालेली होती. पूर्ण दिवस होण्या अगोदर जन्मलेल्या या बालकांचे वजन न भरल्याने जन्मताच त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची वस्तुस्थिती महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी बैठकीत दिली. इतर 12 रुग्ण हे वयोवृद्ध होते. त्यांचा वयोगट 70 ते 80 वर्षे होता. यात 4 वयोवृद्ध हृदय विकार, 2 वृद्ध विविध अवयव निकामी झाल्याने तर 1 वयोवृद्ध विषबाधा व उर्वरीत अपघात मृत्यू असल्याची त्यांनी माहिती दिली.

00000

छाया :- सदा वडजे, नांदेड












No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...