वृत्त, दि. 13 सप्टेंबर 2023
श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद
दोन्ही सण शांतता व एकोप्याने साजरे करावेत
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 13 :- श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी शांतता भंग न होणार नाही याची दक्षता घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक के. ए. धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सन्माननीय सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल माध्यमावरील संदेशामुळे जिल्ह्यात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. याबाबत अगोदर सोशल माध्यमावरील संदेशाची सत्यता तपासून मगच प्रतिक्रिया द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. सणाच्या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गणेश मंडळानी यावर्षी प्रबोधनात्मक देखावे तयार करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. गोवर्गीय पशुधनाच्या सुरक्षितेसाठी व लंम्पी आजारावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात नागरिकांनी पोळा सण साधेपणाने घरच्या घरी साजरा करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
यावर्षी दोन्ही धर्मीयाचे सण एकत्र आले आहेत. दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावेत. गणपती मंडळानी समाजात तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून देखावे साजरे करण्यावर भर द्यावा, असे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले. नागरिकांनी स्वत: होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
समाजाची शांतता भंग करणारे सोशल माध्यमावर संदेश, अफवा अशा अशांततेच्या गोष्टीना टाळून सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्याची काळजी घ्यावी. या उत्सवात सर्व विभागाचे सहकार्य असून पोलीस विभाग दक्ष असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी श्री गणेश उत्सवात विद्युत पुरवठा नेहमी सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल. दहा दिवसासाठी पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्याविषयी कार्यकारी अभियंता विद्युत विभाग यांनी माहिती दिली. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहनाची तपासणी नियमानुसार करुन प्रमाणपत्र निर्गमित केले जाईल. याबाबत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वेळेत देण्याबाबत माहिती दिली. शांतता समितीच्या सदस्यांनी श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण साजरा करण्यासाठी दाखविलेल्या सामजस्यांबाबत समितीच्या सर्व सदस्यांचे जिल्हा प्रशासनाने आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment