ई-पिक पाहणी नोंदविण्यासाठी
23 व 24 रोजी जिल्ह्यात विशेष मोहिम
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- राज्यात 2021 पासून ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला. यात पिक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे स्वत: शेतकऱ्यांच्या पुढाकारातून नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी आपआपल्या पातळीवर योग्य तो समन्वय साधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
या मोहिमेद्वारे कृषि विभागाच्या कृषि सेवकांपासून सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या ई-पिक पाहणी मोबाईल ॲप्लीकेशची माहिती व्हावी, त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी ही मोहिम असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. दिनांक 23 व 24 सप्टेंबर रोजी या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यातील गावांचे संबंधित तहसिलदार हे समप्रमाणात विभाजन करून 50 टक्के गावे तहसिल कार्यालयामार्फत व उर्वरित 50 टक्के गावांमध्ये तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत सदर उद्दीष्टाची पूर्तता करतील, असे त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 556 गावे असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केल्यास सुमारे 3 लाख 11 हजार 200 पर्यंत या मोहिमेचे उद्दीष्ट साध्य होणार आहे. यात तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक / कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी / तरुण मंडळाचे पदाधिकारी या स्वयंसेवकाची निवड करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक पेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीही विश्वासाने सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.
0000
No comments:
Post a Comment