Thursday, July 13, 2023

 विशेष वृत्त

हातभट्टी व ताडीमुक्त अभियानाद्वारे चिकाळातांड्याने घेतले मुक्तिचे श्वास
▪️सलग महिनाभर मोहीम व समुपदेशनामुळे तांड्यावरील लोकांना रोजगाराचे नवे मार्ग
विभागीय उपआयुक्त उषा शर्मा
▪️जिल्हा प्रशासनाकडून शासकीय योजनाद्वारे केली जातेय मदत
नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्हा हातभट्टी व ताडी मुक्त होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक व्यापक मोहिम हाती घेतली आहे. आजवर राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचे अनुभव लक्षात घेऊन याला अधिक सकारात्मक व परिणामकारक करण्यासाठी ज्या हद्दीत हातभट्टी आहे ती संबंधित ग्रामपंचायत, महसूल विभाग व पोलीस विभागासमवेत ही मोहिम राबविली जात आहे. एकाच वेळी धाड टाकून हातभट्टी, ताडी मुक्तीला आळा बसत नसल्याने सलग महिनाभर दररोज समुपदेशनासह कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. या दुहेरी कार्यपद्धतीमुळे आता हातभट्टी चालक रोजगाराच्या नव्या संधीसाठी तयार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हातभट्टीसाठी आव्हानात्मक ठरलेल्या मुदखेड तालुका व विशेषत: मौजे चिकाळा तांडा यासाठी प्रातिनिधीक ठरला असून लवकरच इतर तांडे व ठिकाणे नवा बदलासाठी तयार होतील, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपआयुक्त उषा शर्मा यांनी व्यक्त केला.
हातभट्टी व ताडीमुक्तीचे हे अभियान 10 मे पासून आजतागायत सलग सुरू आहे. मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा हा यासाठी आव्हानात्मक असल्याने यावर लक्ष देण्यात आले. आतापर्यंत 81 गुन्हे दाखल करून 4 लाख 75 हजार 660 रुपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे. याचबरोबर या संपूर्ण परिसरातील सराईत गुन्हेगार शोधून त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. हातभट्टीसाठी जे व्यापारी काळा गुळ पुरवतात त्या व्यापारी व इसमांना शोधून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यातील लोकांना रोजगाराचे नवीन मार्ग मिळावेत यासाठी त्यांच्या पात्रतेप्रमाणे शासकीय योजना पोहचविता याव्यात यादृष्टीने जिल्हा परिषद, महसूल विभाग व शासनाच्या इतर विभागाच्यावतीने एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबर गटविकास अधिकारी, तहसिलदार, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, इतर समुपदेशकांना बोलावून त्यांचाही चिकाळा तांड्यातील लोकांशी सुसंवाद घडवून आणल्या जात असल्याची माहिती उपायुक्त उषा शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात ज्या ठिकाणी हातभट्टी, गावठी दारू, ताडी / सिंधी निर्मिती विक्रीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क दक्ष आहे. नागरीकही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. ज्या गावात हातभट्टी अथवा ताडी व्यवसाय चालू असेल त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 1800 233 9999 या टोलफ्री क्रमांकावर कळवावी, असे आवाहन अधिक्षक अ. अ. कानडे यांनी केले आहे.
00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...