Monday, July 10, 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी 11 जुलै पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी

11 जुलै पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 10 :-औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया 12 जून 2023 पासून सुरु आहे. दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्तीण इच्छूक विद्यार्थ्यांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 11 जुलै 2023 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावून आपला अर्ज निश्चित करावा. त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रीयेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे राज्यभरात एकूण 85 व्यवसाय उपलब्ध असून 1 हजार 549 एवढया जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच अधिकचे तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासाच्या तुकड्या समाविष्ठ करण्यात प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्या वेतनात वाढ करण्यात आलेली आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्वी योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी समकक्षता प्रदान करण्यात येते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र ऑगस्ट 2023 साठी 22 व्यवसायाच्या 37 तुकड्या अंतर्गत 796 जागासाठी प्रवेश उपलब्ध आहे. ज्यात 8 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण /अनुत्तीर्ण पात्रतेवर तर 14 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण पात्रतेवर प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशोच्छूक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज व प्रवेश शुल्क भरावे व नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जावून अर्ज निश्चित करणे करावा. अर्ज भरण्याची व निश्चीत करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2023 आहे. अर्ज निश्चिती केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसाय निवड करता येणार आहे.

आजपर्यत 1 हजार 516 उमेदवारांनी त्यांचे अर्ज संस्थेत निश्चित केले आहेत. अंतीम गुणवत्ता यादी 16 जुलै 2023 रोजी संकेतस्थळावर प्रसारित होणार आहे. प्रथम फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी 20 जुलै 2023 रोजी प्रसारित होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी 21 जुलै ते 25 जुलै 2023 दरम्यान मुळ कागदपत्रासह आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपला प्रवेश अर्ज व निश्चितीकरण दिलेल्या मुदतीत करावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...