शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी
जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
· डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात
जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना हाती घेतली आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या मनात शासकीय योजनांप्रती सकारात्मक आत्मविश्वास निर्माण केला असून नांदेड येथे येत्या काही दिवसातच हा भव्य उपक्रम आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि विविध विभागाचे मंत्री सहभागी होणार आहेत. यादृष्टिने आज प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बराटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
ज्या घटकांसाठी योजना शासनाने तयार केल्या आहेत त्या घटकांच्या मनात योजनांप्रती आस्था व सकारात्मक भाव असणे तेवढेच अत्यावश्यक असते. यातूनच लाभार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग सुरू होतो. सर्व विभाग प्रमुखांनी शासकीय योजनांकडे लाभार्थ्याच्या मनात हा आत्मविश्वास देणे आवश्यक असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांनी शासकीय योजनाच्या माध्यमातून विविध आव्हानांवर मात करून यश मिळविले, अशा प्रातिनिधीक लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते या प्रस्तावित भव्य कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.
00000
No comments:
Post a Comment