Monday, April 24, 2023

 लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य

- जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंह राणा
▪️देगलूर तालुक्यातील शहापूर येथे जल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया
नांदेड, (जिमाका) दि. 24 :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरची गावातही समृद्धी प्रत्ययास येते. नदीला ज्या गावकुशीमध्ये स्वातंत्र्य असते तेथील समाजही अधिक प्रगल्भ व सभ्यता बाळगून असतो. मात्र जिथे नदीला स्वातंत्र्य उरत नाही तिचे तिथे समाजालाही उजाडपण येते या शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नदीच्या अस्तिवाप्रती वास्तवाचे भान आणून दिले. “चला जाणुया नदीला” या अभियानांतर्गत देगलूर तालुक्यातील शहापूर येथे आयोजित जलग्राम सभेत ते बोलत होते.
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव ग्रामसभेची रूजूवात राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, शहापुरचे सरपंच वंदना माडपत्ते, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष तथा जलनायक प्रमोद देशमुख, तहसीलदार राजाभाऊ कदम, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, डॉ. सुमंत पांडे, नदी प्रहरी शिवाजी देशपांडे, वसंत रावणगावकर, यादव बोरगावकर, कैलास येसगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मन्याड नदीच्या काठावरही कधीकाळी श्रीमंती होती. इथल्या नदीकडे जसे दुर्लक्ष झाले तसे इथल्या समृद्धीला आळा बसत गेला. समाजाबरोबर राज व्यवस्थेकडून जेंव्हा दुर्लक्ष होते तेंव्हा समाजही क्षीण बनत जातो. अशा स्थितीत समाजाला भानावर आणण्याचे काम वेळोवेळी संतांनी केले आहे. आज मन्याडच्या काठावर तिन्ही घटक सोबत असून समाजाकडूनही अधिक लोकसहभागाच्या माध्यमातून बांधिलकी वृद्धींगत होईल, असा विश्वास जलपुरूष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.
जल साक्षरतेच्यादृष्टिने जलग्रामसभा हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे. गावाच्या काठावर असलेल्या झाडांपासून, छोटे नदी-नाले, ओहोळ, विहिरी, झरे, लहान मोठी डोंगर ही त्या गावची संपत्ती असते. याला आपण नैसर्गिक संपत्ती म्हणतो. एखाद्या गावाच्या शिवारात जर नदी असेल तर स्वाभाविकच ही नदी सुद्धा त्या गावचा अभिमान असू शकते. नदीचे आरोग्य, तिची स्वच्छता, तिची निगा ही गावाच्या लोकसहभागाशिवाय केवळ अशक्य आहे. जिथे लोकसहभाग आहे तिथे प्रशासनही अधिक सजग व तत्पर होत जाते, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...